राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलन तीव्र झाले असतानाच या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाकडून खासदार झालेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी केली. त्यापूर्वी भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला तीव्र स्वरुप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. तरी देखील राज्य सरकार काही भूमिका घेत नाही. त्यामुळे मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती रस्त्यावर उतरली आहे. या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा, अन्यथा भविष्यात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच आता मोर्चाला नेतृत्वाची गरज असून छत्रपती घराण्यातील खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले किंवा खासदार उदयनराजे यांच्यापैकी कोणी तरी याचे नेतृत्व करावे. समाजाची मागणी लक्षात घेता खासदार संभाजी राजे यांनी भाजपाकडून मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा देऊन समाजाचे नेतृत्व करावे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.