सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने लागू केलेला मराठा आरक्षण कायदा रद्द केला असून, यावर आता हळूहळू प्रतिक्रिया उमटत आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी निकालावर वेगळी भूमिका मांडली आहे. “राष्ट्रवादी, काँग्रेस वा भाजपातील मराठ्यांनी ही काळजी घेतली की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. सातत्याने मी गरीब मराठ्यांना सांगत होतो की, तुम्हाला फसवलं जातंय,” असं म्हणत आंबेडकरांनी गरीब मराठा समाजाला नवीन पर्याय सूचवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात भाजपाचं सरकारही कमी पडलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आधीपासून नकारात्मक भूमिकेत होते. मी म्हणालोय की, ओबीसी आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून आला आहे. गायकवाड आयोग नेमला. तुम्ही राणे आयोग नेमला. हे आयोग शासनाचे आयोग होते, कमिशनचे नव्हते. हे आयोग केंद्राच्या संदर्भातून आलेले नाहीत. हे आयोग राज्य शासनाचे आयोग होते की ज्याच्याशी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी काहीही संबंध नाही. आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक पद्धत निर्माण केली. ती ओबीसी आयोगाची पद्धत होती. त्यांना पाहू द्या की, गरीब मराठ्याला आरक्षणाची गरज आहे की नाही. तो आयोग बाजूला राहिला. आणि यांनी राणे, गायकवाड आयोग स्थापन केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे अहवाल फेकून दिले. ही पद्धत श्रीमंत मराठ्यांनी वापरली. मग तो राष्ट्रवादी, काँग्रेस वा भाजपातील मराठ्यांनी ही काळजी घेतली की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. मी गरीब मराठ्यांना सातत्याने सांगत होतो की, तुम्हाला फसवलं जातंय,” असं आंबेडकर म्हणाले.

आणखी वाचा- आरक्षणाचा निर्णय दुर्दैवी, पण याला गरीब मराठाही दोषी; प्रकाश आंबेडकरांनी केलं भाष्य

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर आंबेडकर म्हणाले, “ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं तर ती मागणीही सर्वोच्च न्यायालयात जाईल. मंडल आयोगाने लावलेल्या ओबीसीच्या निकषांमध्ये मराठा समाज बसणार का? तर अजिबात नाही. त्यामुळे ही मागणी न केलेली बरी. ओबीसीचं ताट आणि गरीब मराठ्यांचं ताट वेगळं असू द्या. गरीब मराठ्यांचं ताट निर्माण करावं लागलं. त्यासाठी गरीब मराठ्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला हवी. नुसत्या सामाजिक संघटनातून हे चालणार नाही. जोपर्यंत गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालेल, तोपर्यंत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही,” असं स्पष्ट मत आंबेडकरांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- मराठा आरक्षण : “…तर फडणवीसांना पुन्हा सत्तेत यावं लागेल”

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, “नाराजी येणार हे मला मान्य आहे. कारण इतके वर्ष आंदोलन पदरात काही पडलं होतं, ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काढून घेतलं गेलं आहे. आमदारांना घेरावं घालतील. ते सगळं ठिक, पण पुढचा निर्णय काय घेतील ते महत्त्वाचं. जे गरीब मराठा समाजाला आश्वासने देत होते की, कुठल्याही परिस्थिती मराठ्यांना आरक्षण देणार, असं म्हणत होते. त्यांना पहिल्यांदा बाजूला सारून नवीन नेतृत्व येऊ द्या, असं झालं तरच काही बदल होईल. नाहीतर श्रीमंत मराठा गरीब मराठ्यांना जगू देणार नाही,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation updates supreme court quashes law granting reservation to maratha community prakash ambedkar bmh
First published on: 05-05-2021 at 14:30 IST