मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक दिली असून कोल्हापुरात बुधवारपासून मूक आंदोलनास सुरुवात होणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजेंबरोबर जायला तयार -प्रकाश आंबेडकर

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी प्रकाश आंबेडकर उद्या कोल्हापुरात जाणार आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करताना अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. यामध्ये प्रकाश आंबेडकरांचाही समावेश होता. संभाजीराजेंनी २९ मे रोजी पुण्यात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. “मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता,” असं यावेळी त्यांनी म्हटलं होतं.

आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं- अजित पवार

सर्वांचा मान राखून आणि करोनाच्या नियमांचं पालन करुन आंदोलन – संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी बुधवारपासून मूक आंदोलनाला सुरुवात होत असताना खासदार संभाजीराजे यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी सांगितलं आहे. कोल्हापुरात शाहू समाधीस्थळावरुन ते संवाद साधत होते.

यावेळी ते म्हणाले की कोल्हापुराला वैचारिक, पुरोगामी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत. त्याचबरोबर त्यांनी शांततेत आंदोलन पार पाडण्याचं आवाहनही केलं आहे. ते म्हणाले, आंदोलनादरम्यान कोणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा. हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवं.