मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया एकीकडे सुरू असताना येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या परिसरात तुडुंब गर्दी दिसून येत असताना हेच दृश्य संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही पाहावयास मिळाले. संस्थेच्या गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात मविप्रची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते. ‘मविप्र’ निवडणुकीत समाज विकास पॅनल आणि प्रगती पॅनल यांच्यात उडालेल्या राजकीय धुळवडीचे पडसाद या सभेतही स्पष्टपणे उमटले. सभासदांकडून सूचना मांडताना मूळ विषयाला बगल देऊन आरोप-प्रत्यारोपच अधिक प्रमाणात करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अरविंद कारे, नीलिमा पवार, विनायकदादा पाटील, कृष्णाजी भगत, नारायण हिरे, बाबूराव गोवर्धने, मोहन पिंगळे, नानासाहेब बोरस्ते, प्रमोद पाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते. इतिवृत्ताचे वाचन सुरू असताना एका सदस्याने मध्येच प्रश्न उपस्थित करीत वाद घालण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर २०११-१२ वर्षांच्या अहवालाचे वाचन करून मंजूर करण्यात आले. २०११-१२ मधील संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयासह सर्व शाखांचे विभागवार एकत्रित खर्च, उत्पन्न पत्रक व ताळेबंद यांसह २०१२-१३ या वर्षांसाठी संस्थेच्या एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.
तसेच हिशेब तपासणीसाची नेमणूक करण्यात आली. संस्थेचे कार्यकारी मंडळ, पदाधिकारी व सदस्य यांच्या पंचवार्षिक निकालाची नोंद घेणे या विषयांसह आयत्या वेळी आलेल्या विषयाची दखलही या वेळी घेण्यात आली. सभासदांना संस्थेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत देण्यासह सभासदांचा अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
एका महिला सभासदाने संस्थेच्या कार्यकारिणीत दोन महिलांना स्वीकृत म्हणून घेण्याची सूचना केली. ‘कसमादे’ पट्टय़ातील अनेक सभासदांनी ग्रामीण भागांत महाविद्यालय सुरू करण्याची सूचना केली.