पानिपत रणसंग्रामाला २५७ वर्षे पूर्ण
पानिपतच्या युद्धामध्ये मराठेशाहीचा दारुण पराभव झाला, मात्र या युद्धातील मराठेशाहीचे सेनापती सदाशिवराव भाऊ यांची समाधी रोहतक जिल्ह्यातील सिंधी या गावी असल्याचे आढळून आली असून, सध्या ही समाधी नाथपंथीय मठामध्ये असल्याचा दावा इतिहास अभ्यासक प्रवीण भोसले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. १४ जानेवारी रोजी पानिपत रणसंग्रामाला २५७ वर्षे होत असून, या मराठेशाहीतील अजरामर मर्दुमकी गाजवणाऱ्यांची समाधी आजही दुर्लक्षित असून याचे जतन होण्याची गरज असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
पानिपत युद्धामध्ये मराठय़ांच्या सेनेचे नेतृत्व सदाशिवराव भाऊंनी केले होते, मात्र त्यांच्या समाधिस्थळाबाबत फारशी माहिती महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही. पानिपत परिसरामध्ये मिळालेल्या स्थानिक माहितीमधून रोहतक जिल्ह्यातील सिंधी या गावात नाथपंथीय मठामध्ये सदाशिवराव भाऊंची समाधी असून या ठिकाणी अलीकडच्या काळात पुतळाही समाधीवर उभारण्यात आला आहे. आजही या परिसरात मराठय़ांच्या मर्दमुकीचे पोवाडे गायले जातात. मठामध्ये पूर्वापार ठेवलेल्या नोंदींमध्येही हा मठ भाऊंनी स्थापन केल्याचा उल्लेख आहे. तसेच मराठय़ाच्या लढय़ातील आणखी एक महत्त्वाचा मोहरा म्हणून ओळखले जाणारे ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ म्हणणारे दत्ताजी शिंदे यांची समाधी बराडी घाटात आढळत नाही, मात्र त्यांच्यावर अंत्यविधी बुराडी घाटावरच झाला . इतिहासात दुर्लक्षित मराठा योद्धय़ांची ही स्मारके आज दुर्लक्षित असून त्यांच्या जतनाची गरज असल्याचे भोसले यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2018 3:41 am