बीड जिल्ह्य़ातील ११ पंचायत समित्यांपैकी ७ पं.स.वर भाजपचा वरचष्मा, तर ४ पं.स.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती व उपसभापती निवडले गेले. राष्ट्रवादीच्या ताब्यातील २ पं.स. सभापती निवडीत बरेच बदल झाले. झालेले सत्तांतर आमदार पंकजा मुंडेंमुळे झाल्याचा दावा बीड भाजपच्या वतीने केला जात आहे. समान सदस्य संख्या असलेल्या केजमध्ये भाजपला तर वडवणीत राष्ट्रवादीला यश मिळाले.
 बीड पंचायत समितीत काकासाहेब जोगदंड यांना पुन्हा संधी मिळाली, तर उपसभापतिपदी अरुण लांडे यांची निवड झाली. गेवराई पं.स.च्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या आशा गव्हाणे तर उपसभापतिपदी अभिजित पंडित यांची निवड झाली. माजलगाव पं.स.च्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या अनिता विश्वंभर थावरे तर उपसभापतिपदी कमल आत्माराम जाधव यांना संधी मिळाली. पाटोदा पं.स. सभापती म्हणून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले महायुतीचे माजी आमदार भीमराव धोंडे समर्थक अनिल जायभाये यांची तर उपसभापतिपदी प्रमिला सगळे यांची निवड झाली. आष्टीत प्रियंका सावंत यांची सभापतिपदी तर रंगनाथ धोंडे यांची उपसभापती वर्णी लागली. भाजपच्या ताब्यात असलेल्या वडवणीत दोन्ही पक्षांच्या सदस्यांची समान संख्या झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. यात राष्ट्रवादीच्या मीरा ढोले तर उपसभापतिपदी पार्वती वाघमारे यांची निवड झाली.  केजमध्येही रमेश आडसकर यांच्या भाजप प्रवेशामुळे दोन्ही पक्षांचे संख्याबळ समान झाल्यामुळे काढण्यात आलेल्या चिठ्ठीत सभापतिपदी भाजपच्या अनिता मोराळे तर उपसभापतिपदी सरोजिनी ससाणे यांची वर्णी लागली. धारुरमध्येही सभापतिपदी भाजपचे अर्जुन तिडके तर उपसभापतिपदी मंगल चोले यांची निवड झाली. धारूर पंचायत समिती यापूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. परळीत भाजपच्या विद्यावती गडदे यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी प्रा. बिभीषण फड यांची निवड झाली. अंबाजोगाई येथेही भाजपने उषा जीवन किर्दत तर उपसभापती म्हणून सविता लव्हारे यांना संधी दिली. शिरूरकासार पंचायत समितीत सभापतिपदी पुन्हा भाजपच्या मंडाबाई केदार यांना संधी मिळाली आहे तर उपसभापतिपदी जािलदर सानप यांची निवड करण्यात आली.
परभणी जिल्ह्यात नऊपकी चार सभापती बिनविरोध
वार्ताहर, परभणी
जिल्ह्यातील नऊपकी चार पंचायत समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली असून पालम, जिंतूर, सोनपेठ, पाथरी येथे राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे तर मानवत, परभणी आणि सेलूत शिवसेनेने बाजी मारली आहे तर पूर्णे व गंगाखेड येथे अपक्ष सदस्यांची सभापती म्हणून निवड झाली आहे.
जिल्ह्यातील ९ पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडीसाठी रविवारी दुपारी २ वाजता सर्वच पंचायत समिती सभागृहात विशेष बठका घेण्यात आल्या. पालम येथे राष्ट्रवादीचे विजयकुमार िशदे यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी शेकापच्या चित्रकला हत्तीअंबीरे, जिंतूर येथे राष्ट्रवादीच्या शांताबाई वचिष्ठ गायकवाड यांची सभापती तर उपसभापती याच पक्षाचे शेख मोबिन, सोनपेठ येथे सभापतिपदी राष्ट्रवादीच्या छाया िशगाडे, उपसभापतिपदी मदन विटेकर, पाथरी येथे सभापतिपदी राष्ट्रवादीचे तुकाराम जोगदंड, उपसभापती डॉ. बाळासाहेब घोक्षे यांची बिनविरोध निवड झाली.  तसेच परभणी पंचायत समिती सभापतिपदी शिवसेनेच्या निलावती बाबुराव गमे तर उपसभापतिपदी राजेंद्र गमे हे विराजमान झाले आहे. मानवत येथे सभापतिपदी शिवसेनेच्या विद्यमान सभापती अॅड. रोहिणी सोरेकर व उपसभापती दीपक मगर हेच कायम राहिले आहेत. सेलूत शिवसेनेच्या बायनाबाई गमाजी लोंढे सभापतिपदी तर राष्ट्रवादीचे संतोष डख यांची उपसभापतिपदी निवड झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असतानाही केवळ मागास प्रवर्गातील महिला उमेदवार नसल्यामुळे सभापतिपद शिवसेनेकडे गेले. पूर्णा येथे सभापतिपदी अपक्ष सदस्या चंद्रकला देसाई तर उपसभापतिपदी काँग्रेसचे शिवसांब देशमुख हे विजयी झाले आहे. गंगाखेड येथे सभापतिपदी अपक्ष सदस्य भगवान कदम तर उपसभापतिपदीही अपक्ष सदस्या मंजूषा जामगे यांची बिनविरोध निवड झाली.
जालना पं. स.च्या निवडीत युतीची बाजी
युतीकडे ६ तर २ राष्ट्रवादीच्या ताब्यात
वार्ताहर, जालना
 जिल्ह्य़ातील ८ पैकी ६ पंचायत समित्या शिवसेना-भाजपच्या ताब्यात, तर २ राष्ट्रवादीकडे राहिल्या.
जालना पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या द्रोपदाबाई थेटे तर उपसभापतिपदी भाजपचे गणेश नरवडे यांची निवड झाली. ही पंचायत समिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या ताब्यात होती. परंतु या वेळेस शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दोन्हीही उमेदवारांचा पराभव केला.
जालना पं. स.त काँग्रेस-राष्ट्रवादी ७, शिवसेना-७, भाजप आणि मनसे प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे.
घनसावंगी पं. स.च्या सभापतिपदी शिवसेनेचे प्रेमसिंग राठोड तर उपसभापतिपदी डॉ. संजय राऊत बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादीचे दोन्हीही सदस्य अनुपस्थित होते. परतूर पं. स. सभापतिपदी छायाबाई माने (भाजप) आणि उपसभापतिपदी तुकाराम बोनगे (भाजप) निवडून आले. मंठा सभापतिपदी शिवसेनेच्या ऊर्मिला सरोदे आणि उपसभापती काँग्रेसचे संतोष पवार निवडून आले. भोकरदन सभापतिपदी संगीता लोखंडे (भाजप) आणि उपसभापतिपदी नवनाथ दौड (शिवसेना) यांची निवड झाली.  जाफराबाद पं. स. सभापतिपदी रमाबाई चोथमल (भाजप) यांची निवड झाली. उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केलेल्या दोघांनीही उमेदवारी अर्ज परत घेतल्याने त्या पदाची निवडणूक झाली नाही. अंबड पं. स. सभापतिपदी ज्योती गावडे (राष्ट्रवादी) आणि उपसभापतिपदी दिनेश जायभाये (राष्ट्रवादी) निवडून आले. बदनापूर सभापतिपदी राष्ट्रवादीचे आदनान सौदागर तर उपसभापतिपदी काँग्रेसचे संजय जगदाळे निवडून आले.
पं. स. सभापती निवडीत आघाडीसह मनसेची बाजी
प्रतिनिधी, औरंगाबाद
 औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे सुनील हरणे तर उपसभापतिपदी गयाबाई ठोंबरे यांची निवड करण्यात आली. उपविभागीय अधिकारी बाप्पासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हरणे व ठोंबरे यांना प्रत्येकी १० मते पडली, तर विरोधी उमेदवार शिवसेनेचे गणेश नवले व भाजपचे बळीराम गावंडे यांना प्रत्येकी ७ मते पडली.
 वैजापूर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या पुढील अडीच वर्षांच्या कार्यकालासाठी ओबीसी प्रवर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या द्वारका पवार यांची, तर उपसभापतिपदी सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या दोन्ही पदासाठी द्वारका पवार व सुभाष जाधव यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्या दोघांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी नारायण उबाळे यांनी सांगितले.
 सिल्लोड पं. स.त दुग्धविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वर्चस्वाला धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ सदस्यांपैकी २ सदस्य भाजपला मिळाले. १ सदस्य गैरहजर राहिला आणि एका सदस्याने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे पं. स.च्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या लताबाई वानखेडे, तर उपसभापतिपदी इद्रिस मुल्तानी यांची निवड झाली. १६ सदस्यांपैकी ६ भाजप, ६ काँग्रेस तर ४ राष्ट्रवादीचे सदस्य आहेत.
 पैठण पं. स.च्या सभापतिपदी मनसेच्या पुष्पा केदारे तर उपसभापतिपदी मनसेचेच कृष्णा गिधाने यांची निवड झाली. शिवसेनेच्या ज्योती फसाटे यांना ७ मते मिळाली, तर विजयी उमेदवारांना प्रत्येकी ९ मते मिळाली. सोयगाव पं. स.च्या सभापतिपदी काँग्रेसच्या नंदाताई आगे, तर उपसभापतिपदी चंद्रकांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. खुलताबाद पं. स.च्या सभापतिपदी काँग्रेसच्या फरजाना पटेल तर आमदार प्रशांत बंब गटाचे दिनेश अंभोरे यांची उपसभापतिपदी निवड झाली. गंगापूर तालुक्यात शिवसेनेचे संजय जैस्वाल, तर उपसभापती वर्षां गंडे यांची निवड झाली. कन्नड पं. स.च्या सभापतिपदी मनसेचे खेमा मधे व उपसभापतिपदी प्रकाश गाडेकर यांची निवड झाली.
पं. स. सभापती निवडीत शिवसेनेची बाजी
सेनगावमध्ये अपक्ष तर हिंगोलीत राष्ट्रवादी
वार्ताहर, िहगोली
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे भाजप- शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्यावर अपक्षाच्या गळ्यात सभापतीची माळ पडली. तर वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे उमेदवार निवडले गेले. िहगोलीत राष्ट्रवादीने बाजी मारली.
जिल्ह्यातील वसमत पंचायत समितीच्या शिवसेनेच्या विद्यमान सभापती राहुबाई पांडुजी बेले यांनाच सभापतिपदावर दुसऱ्यांदा संधी मिळाली, तर उपाध्यक्षपदी संभाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. कळमनुरी पंचायत समितीत शिवसेनेच्या महानंदा लोणे या बिनविरोध निवडून आल्या, तर उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिल कंठवार यांनी काँग्रेसचे धनाजी सूर्यवंशी यांचा ६ विरुद्ध १४ मताने पराभव केला.
िहगोली पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीताबाई राठोड व शिवसेनेच्या शिवनंदा मगर यांच्यात सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत सीताबाई राठोड यांनी शिवनंदा मगर यांचा ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला, तर उपसभापतिपदासाठी काँग्रेसचे शिवाजी जगताप यांनी विजय मिळविला. सेनगाव पंचायत समितीमध्ये सभापतिपदासाठी अपक्ष शारदा पोपळघट तर उपसभापतिपदी अपक्ष उमेदवार संजीवनी सुभाष िशदे यांना भाजपा-सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी पािठबा दिल्याने बाजी मारली. याच प्रमाणे औंढा नागनाथ पंचायत समितीवर सभापतिपदी राजेंद्र सांगळे व उपसभापतिपदावर अनिल देशमुख यांची निवड झाली.
पं. स. सभापती निवडीत आघाडीशी सरशी
वार्ताहर, लातूर
पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची १० पैकी ८ तालुक्यांत सरशी झाली असून दोन तालुक्यांत भाजपने आपले वर्चस्व टिकविले.
लातूर, रेणापूर, औसा, निलंगा, चाकूर, अहमदपूर, उदगीर व जळकोट या ८ तालुक्यांतील पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने आपली सरशी कायम ठेवली. देवणी व शिरुरअनंतपाळ या दोन्ही तालुक्यांत सभापती व उपसभापतिपद भाजपाने पटकाविले. देवणी तालुक्यात भाजपा व आघाडीची मते समसमान झाली. त्यामुळे नाणेफेक करून दोन्ही पदांची निवड करण्यात आली. नाणेफेकीने भाजपकडे कल दिल्यामुळे सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे भाजपकडे गेली.