बालविवाह म्हणजे समाजाला लागलेली वैचारिक वाळवी आहे असं मत अभिनेता सुबोध भावे याने व्यक्त केलं आहे. सुबोध भावेने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये शाळेत शिकणाऱ्या चिमुरडीचं तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न झालेलं दाखवण्यात आलं आहे. तसंच ही मुलगी शाळेच्या गणवेशातच लग्न करुन नवऱ्यासोबत चालली आहे हे दाखवण्यात आलं आहे. अत्यंत विदारक स्थिती मांडणारं हे चित्र आहे. बालविवाहाच्या या प्रश्नाबाबत सुबोध भावेने सडेतोड भाषेत त्याचे विचारही मांडले आहेत. बालविवाह ही समाजाला लागलेली वैचारिक वाळवी आहे अशा शब्दात त्याने या प्रथेवर शाब्दिक प्रहार केला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सुबोध भावेने?
एकीकडे स्रीला देवी समजून तिची पूजा करायची हा संस्कार असताना दुसरीकडे समाजातील एका वर्गात मोठ्या प्रमाणात मुलीला ओझे समजून… अल्पवयातच तिचा विवाह लावून दिला जातो. ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैचारिक… कुठल्याच आघाडीवर परिपक्व नसतानाही तिला आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी बालविवाह करण्यात येतो.
३०० बालविवाह या करोना काळात ठरले होते. मराठवाड्यात सर्वाधिक तसेच सोलापूरमध्ये, यातील 255 मोडून काढण्यात सरकारला यश आलं… मुलगी म्हणजे जबाबदारी… खर्च… परक्याचे धन अशा समजुती… तिचं चारित्र्य म्हणजे काचेचे भांडे ही मानसिकता. तिचं शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, शारीरिक फिटनेस याकडे डोळेझाक करून तिच्या मतांचा विचार न करता तिला परक्या घरी ढकलली जाते. यातील भीषण सत्य म्हणजे महाराष्ट्रातील दर चार विवाहांमागे एक बाल विवाह होतो.

याचा गंभीर परिणाम म्हणजे तिचे शिक्षण थांबते…. त्यामुळे विचार करणे थांबते आणि अर्थातच निर्णय घेणे ही…
जी स्वतःच शारीरिक सक्षम नसते तिच्यावर अल्पवयातच मातृत्व लादले जाते आणि अशक्त आईचे अशक्त मूल… यानुसार कमकुवत समाज निर्माण होऊ लागतो.आयुष्यभर आर्थिक पारतंत्र्य येते आणि “या” घरातील मुलगी अल्पवयातच “त्या” घरची सुन होऊन कायम स्वरुपी पारतंत्र्यात जखडली जाते.

सध्याच्या करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बालविवाहांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते.
मुलांच्या हक्कांबद्दल झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNCRC) बालविवाह हे मुलांच्या अधिकारावर केलेले अतिक्रमण सांगितले आहे. संवाद, कार्यक्रम, व्यवस्थापने, कायदा या चारही अंगांनी रणनीती आखून या समस्येच्या मुळाशी जाण्याचा निर्धार, ही समस्या समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार, युनिसेफ आणि ग्रॅव्हिटस फाऊंडेशनने केला आहे. यावर उपाययोजना म्हणजे,प्रत्येक जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध अधिकारी, बालकल्याण समिती, महिला बालविकास विभाग याची अर्ध्या रात्री पण मदत घेऊन बालविवाह थांबवले पाहिजेत. आपण सगळेच एकत्र येऊन एक लढा उभारूया, समाजाला कमकुवत बनवणाऱ्या या वाळवीपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी सक्रीय होऊया…