मुंबई आणि येथील रस्त्यांवरील खड्डे हे जणू आता एक समीकरणचं झालं आहे. प्रशासनाने मुंबईमध्ये असंख्य सोयी- सुविधा पुरविल्या असल्या तरीदेखील खड्ड्यांच्या समस्येपासून सुटका करण्यास मात्र त्यांना फारसं यश आलेलं नाही. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. तसंच सामान्य नागरिकांना सुद्धा रोज या खड्ड्यांमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यातच मराठी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ अभिनेता प्रशांत दामले यांनी संताप व्यक्त करत ‘कल्याण = उत्तम नाट्यरसिक, कल्याण = थर्ड क्लास रस्ते’,अशी उपरोधिकपणे टीका केली आहे. तर ‘खड्डे,बेशिस्तपणा,निष्काळजीपणा आणि देशाच्या वाहतुकीचे नियम न पाळता जीव घेणारे छुपे दहशतवादी’, अशी खरमरीत टीका अभिनेता सुबोध भावेने केली आहे.


ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले,सुबोध भावे यांच्यासह दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी,समीर चौघुले आणि आस्ताद काळे यांनी शहरांतील रस्त्यांच्या परिस्थितीबाबत समाजमाध्यमांवरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.



दरम्यान, आता प्रसिद्ध कलाकारांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्यांची स्थिती थोडीफार का होईना सुधारली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.