16 January 2021

News Flash

धुळे ‘गुन्हेगारीमुक्त’ कधी?

गुन्हेगारांचा मुक्त वावर अन् नेते उणीदुणी काढण्यात मश्गूल!

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गुन्हेगारांचा मुक्त वावर अन् नेते उणीदुणी काढण्यात मश्गूल!

अतिशय निर्घृणपणे टोळक्याने गुंड रफियोद्दीन शफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्डय़ा याची हत्या केल्यानंतर शहरातील टोळीयुद्धाचे अतिशय भयावह वास्तव समोर आले. जातीय दंगलीचा इतिहास लाभलेल्या धुळ्यात प्रस्थापित गुन्हेगारी टोळ्यांमधील वादाने शहरवासीयांना वेठीस धरले आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संवेदनशील भागांत पोलीस बंदोबस्त व गस्त वाढविण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली असताना शांततेसाठी पुढाकार घेण्याऐवजी राजकीय पातळीवर परस्परांची उणीदुणी काढण्यात धन्यता मानली जात आहे. ‘गुन्हेगारीमुक्त धुळे शहर’ अशी घोषणा देणारे अनील गोटे यांची संकल्पना १३ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कधी प्रत्यक्षात आली नाही. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हेगारी टोळक्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी धडाडीने मोहीम राबविली नसल्याने ही स्थिती उद्भवल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.

शहर व पर्यायाने जिल्ह्य़ातील कोणीही नागरिक संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे लक्ष्य ठरू शकतो हे नुकत्याच झालेल्या घटनेतून अधोरेखित झाले. गुड्डय़ा गुन्हेगार होता म्हणून कदाचित या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. परंतु या घटनेमुळे शहरासह ग्रामीण भागातही भयावह वातावरण आहे. ज्या रस्त्यावर गुड्डय़ाचा खून झाला, त्या पारोळा रस्त्यावर सकाळी शाळा-महाविद्यालय व शिकवणीला निघालेल्या विद्यार्थ्यांची अधिक वर्दळ असते. या भागातून मार्गस्थ होताना त्यांच्या चेहेऱ्यावर अनामिक भीतीची छाया उमटल्याचे पाहावयास मिळाले. खरेतर प्रस्थापित गुन्हेगारी पूर्णपणे मोडून काढणे अवघड नाही. त्यासाठी पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागेल. सामाजिक कार्यकर्ते आणि महत्त्वाचे म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींचा शांतता-सुव्यवस्थेसाठी सक्रिय सहभाग आवश्यक आहे. प्रसंगी कटुता घेण्याची तयारी या मंडळींना घ्यावी लागेल. पण त्यात कोणाला स्वारस्य आहे की नाही, हा प्रश्न आहे.

खुनाच्या घटनेने पोलीस यंत्रणेची आजवरची कार्यशैली उघडी पडली. या घटनेने पोलिसांसमोर नवी संकटे उभी ठाकली आहेत. खुनाच्या घटनेच्या चित्रणातून गुन्हेगारी टोळ्यांचा शहरात कसा मुक्त वावर आहे हे सर्वदूर पोहोचले. गुन्हेगारी विश्वात ‘भाई’ म्हणून वावरायचे असेल तर असे गुन्हे करून भांडवल करायचे असा गोयर व देवरे बंधूंच्या टोळीचा प्रयत्न आहे.

गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी आधुनिक सामग्रीच्या माध्यमातून तो अधिकाधिक उंचावत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर कोणीही असो, शहर-जिल्ह्य़ात नवनव्या संकल्पना अमलात आणत गुन्हेगार आपल्या सदस्यांची संख्या वाढवत टोळ्या सक्रिय करण्यावर भर देत आहेत.

स्थानिक राजकीय पुढारी परस्परांची उणीदुणी काढण्याशिवाय गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी ठोस असे काहीही करायला तयार नाही. उलट अशा टोळ्यांना कायद्याच्या बडग्यापासून अभय मिळवून देण्यासाठी काय करता येईल किंवा लपूनछपून अशा गुन्हेगारांना कसे पाठीशी घालता येईल असाच संबंधितांचा प्रयत्न असतो. या माध्यमातून राजकीय मांड घट्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, असा येथील अनुभव असल्याचे आ. गोटे यांचे म्हणणे आहे. परंतु गोटे यांच्या आमदारकीला जवळपास १३ वर्षे उलटत आहेत. त्यांच्या संकल्पनेतील ‘गुन्हेगारीमुक्त धुळे शहर’ अद्याप अस्तित्वात आलेले नाही. यामुळे गोटे यांची भूमिका केवळ राजकारणासाठीच असून वाढत्या गुन्हेगारीशी त्यांनाही काही देणेघेणे नसल्याचे दिसून येते.

महत्त्वाची बाब म्हणजे देशाचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आपल्या शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची त्यांच्यावरही मोठी जबाबदारी आहे. राज्याचे गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने तसेच अलीकडेच फडणवीस यांनी धुळ्यातील दौऱ्यात आश्वासनांची खैरात केली असल्याने आता गृहमंत्री म्हणून ते धुळ्यासाठी काय करतात, हेही महत्त्वाचे आहे.

गुन्हेगारीमुक्त नव्हे तर गुन्हेगारीयुक्त अशी धुळ्याची ओळख बनली आहे. भुरटय़ा चोरीपासून ते सशस्त्र दरोडा, सोनसाखळ्या पळविणे, खून, लूटमार, अपहार, फसवणूक, लाचखोरी, बलात्कार, अपहरण, भूखंड आणि वाळू माफियांची दादागिरी, रेशनिंगचा काळाबाजार, गुटखा, रसायनांची अवैध वाहतूक असे बरेच काही जिल्ह्य़ात घडत असते. आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. वाहतुकीचे स्वयंचलित सिग्नलही बंद पडलेले आहे, अशी सर्व पातळीवर अनास्था आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2017 2:32 am

Web Title: marathi articles on crime in dhule
Next Stories
1 तब्बल ८४ वर्षे घोडय़ावरूनच प्रवास
2 पश्चिम विदर्भावर दुष्काळाचे सावट
3 मुत्थुट फायनान्स दरोडा प्रकरणातल्या मास्टरमाईंडला अटक
Just Now!
X