पक्ष रायगडपुरताच सीमित; राज्यभर पुनर्बाधणीची गरज; पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान

राज्यात काँग्रेसला समर्थ पर्याय उभा करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षातील बडय़ा नेत्यांना माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या गोटात दाखल करून घेतले. मग हळूहळू पक्षाचा प्रभाव कमी होत गेला. प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजाविणारा हा पक्ष नंतरच्या काळात काही जिल्ह्य़ांपुरताच सीमित राहिला. आता तर रायगड या एकाच जिल्ह्य़ात पक्षाचे अस्तित्व टिकून असून इतर जिल्ह्यांत पक्षाची पकड कमी झाली आहे.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
birendra singh
सर्व दहा जागा राखण्याचे हरियाणात भाजपपुढे आव्हान
narendra modi majority in lok sabha polls BJP agenda after 2024
काशी-मथुरा, समान नागरी कायदा आणि मतदार संघांची पुनर्रचना; नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास काय निर्णय घेऊ शकतात?
Supriya Sule, Sharad Pawar,
भाजपचे एकच स्वप्न, शरद पवारांना संपवणे; सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार

राज्यात डाव्या विचारांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेला उद्या ७० वर्षे पूर्ण होत आहेत. २ ऑगस्ट १९४७ साली या पक्षाची स्थापन करण्यात आली होती. कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न घेऊन चळवळ उभारण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून या कालखंडात करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालखंडात पक्ष मोठय़ा प्रमाणात वाढला. राज्याचे विरोधी पक्षनेतेपद भूषवण्याची संधी शेकापला मिळाली. नारायण नागू पाटील, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, गणपत पाटील, एन. डी. पाटील यांनी पक्षाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र प्रभाकर पाटील यांच्या मृत्यूनंतर पक्षाला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली. पक्षासाठी आयुष्य वेचणारे दि. बा. पाटील, दत्ता पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्ष सोडून गेले. नवीन नेते पक्षात यायला उत्सुक राहिले नाहीत. त्यामुळे समाजवादी विचारसरणीला उतरती कळा लागली. पक्षाची पडझड सुरू झाली.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला याची मोठी किंमत चुकवावी लागली. एकेकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते पद भूषवणारा हा पक्ष रायगड जिल्ह्य़ापुरताच मर्यादित राहिला. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पक्षाची वाताहत सुरू असताना शेतकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पक्षाची पडझड काही प्रमाणात थांबली.

एन. डी. पाटील यांचे सरचिटणीसपद काढून ही जबाबदारी आमदार जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली. पक्षात तरुणांना संधी मिळायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली. नवीन कार्यकर्त्यांना संधी दिल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते अडगळीत पडले आणि ते हळूहळू सक्रिय राजकारणातून बाहेर गेले. नवीन लोकांना संधी मिळाल्याशिवाय पक्ष वाढणार नाही, या भूमिकेवर जयंत पाटील ठाम राहिले. नवीन कार्यकत्रे घडावेत यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. सघटनात्मक बांधणी सुरू झाली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण साखर उद्योगाभोवती फिरते हे लक्षात घेऊन कोल्हापूर येथे साखर कारखाना सुरू केले. सहकारातून उद्योग आणि उद्योगातून राजकारण या माध्यमातून पक्षाची वाटचाल सुरू केली.

१९९९ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये शेकाप सहभागी झाला. गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. रायगडमध्ये आज शेकाप आणि सुनील तटकरे यांची युती असली तरी तेव्हा मात्र दोघेही कट्टर विरोधक होते. तटकरे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्यावरून बरेच फाटले आणि त्याची परिणती विलासराव देशमुख सरकार पडण्यापर्यंत गेली होती. शेकापची तेव्हा चलती असताना भाई जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री रायगड भवनमध्ये ठरेल, अशी दर्पोक्ती केली. त्याच शेकापला अलिबागची जागाही कायम राखता आली नव्हती, हा इतिहास आहे.

कधी रिपब्लिकन पक्षासोबत, तर कधी डाव्या पक्षांशी आघाडी करून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शेकापच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, मात्र ते फारसे यशस्वी झाले नाहीत. या आघाडय़ा निवडणुकीपुरत्याच चच्रेत राहिल्या, मात्र अपयशामुळे खचून न जाता पक्षाने आपली वाटचाल सुरूच ठेवली. अलीकडच्या काळात मराठा समाजात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल असंतोष निर्माण झाला. हा अंसतोष लक्षात घेऊन पक्षाने मराठा समाजाला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले.

संभाजी ब्रिगेडसह मराठा संघटना एकत्र करण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत करण्यात आला. प्रवीण गायकवाड यांच्यासह काही मराठा समाजातील नेत्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला, मात्र राज्यभर पक्षाचे जाळे विणणे आणि पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान नेतृत्वाला पेलावे लागणार आहे.

नवी समीकरणे आणि आव्हाने

  • रायगड जिल्हा हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. बाळाराम पाटील आणि विवेक पाटील या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोर जावे लागले आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी स्थानिक पातळीवर जुळवून घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा वर्चस्व राखण्यात पक्षाला यश आले आहे. तर कोकण शिक्षक मतदारसंघातून बाळाराम पाटील यांना विधान परिषदेवर पाठवण्यात पक्ष यशस्वी झाला आहे.
  • स्थानिक पातळीवर शिवसेनेचा जिल्ह्य़ात वाढणारा प्रभाव रोखणे आणि राज्यपातळीवर पक्षाची पुनर्बाधणी करणे अशा दोन आघाडय़ांवर पक्षाला सध्या काम करावे लागत आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पक्षाची वाटचाल कशी होते आणि त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
  • जयंत पाटील यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. अगदी अलीकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. पुढील वर्षी जयंत पाटील यांच्या आमदारकीची मुदत संपत आहे. दोन-तीन आमदारांच्या संख्याबळावर जयंत पाटील यांनी लागोपाठ दोनदा विधान परिषदेची आमदारकी मिळविली. आता कोणाच्या मदतीने भाई विधान परिषदेत जाणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

झालेल्या चुकांचा अभ्यास करून, त्या दुरुस्त करण्याचा निर्णय आता पक्षाने घेतला आहे. नवीन कार्यकत्रे घडवून पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. राज्यातील वाढती बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, सहकारी साखर कारखान्यांची ढासळती स्थिती आणि प्रकल्पांच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी या मुद्दय़ांवर आगामी काळात चळवळ उभी करण्यात येणार आहे.  -जयंत पाटील, आमदार व सरचिटणीस, शेकाप