नागपूरमध्ये सर्पविषाच्या तस्करीला आळा घालण्यात अपयश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मादकद्रव्य म्हणून ‘रेव्ह पाटर्य़ा’मध्ये होणारा वापर आणि ‘अॅन्टीव्हेनम’साठी लागणारी विषाची गरज यामुळे सापांच्या विषाच्या तस्करीत कोटय़ावधी रुपयाची उधळण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात फोफावलेला मादकद्रव्याच्या निर्मितीमधील सापांच्या विषाचा व्यापार आता देशांतर्गतसुद्धा तेवढय़ाच वेगाने फोफावत आहे. महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ नागपूर सर्पविषाच्या तस्करीचे दुसऱ्या क्रमांकाचे केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. सापांच्या विषतस्करीला आळा घालण्यात मात्र अजूनपर्यंत वनखात्याला यश आलेले नाही. परिणामी हा व्यापार मोठय़ा प्रमाणावर वाढत चालला आहे.

वन्यजीव अधिनियमांचा दाखला देत सापांच्या खेळांवर, त्याच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आली, पण सापाच्या तस्करीला आळा घालण्यात अजूनपर्यंत वनखात्याला यश आलेले नाही. अगदी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी उपराजधानीत २५ मिलिलिटरच्या सर्पविषाच्या दोन बाटल्यांसह तस्करांना अटक करण्यात आली आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध उघडकीस आले. सापांच्या विषाला मिळणारी मोठी किंमत आयामुळे अनेक जण या व्यवसायाकडे वळत आहे. मात्र, त्या अनेकजणामुळे चांगल्या उद्देशाने काम करणाऱ्या सर्पमित्रांकडे संशयाने पाहिले जाते. सापांच्या प्रजाती आणि त्याच्या विषाची दाहकता यावरून दीड ते दोन लाख रुपये प्रति मिलिग्रामसाठी मोजले जातात. सापांच्या विषाची खरेदी करणाऱ्यांमध्ये ते नशेकरिता खरेदी करणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या दराने विषाची विक्री केली जाते. चरस, गांजा या मादक द्रव्याच्या नशेपेक्षाही वेगळी नशा सापाच्या विषाची असल्याने इंजेक्शनच्या माध्यमातून ते काही प्रमाणात शरीरात पेरले जाते. या ठिकाणी १०० मिलिग्रॅमसाठी ५० ते ६० हजार रुपयेसुद्धा मोजले जातात. अंधश्रद्धेसाठी अनेक वन्यजीवांचा वापर होतो आणि त्यात सापांचाही समावेश आहे. याशिवाय विदेशात सापाच्या विषाचा वापर औषधात होतो म्हणून तोच प्रकार आता भारतातही व्हायला लागला आहे. प्रामुख्याने सोरायसिससारख्या आजारावर औषध म्हणून सर्पविषाचा वापर होतो. प्रामुख्याने वैदू किंवा गावठी उपचार करणारे लोक सोरायसिसकरिता सर्पविषाचा वापर करतात. वास्तविक यात रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, पण विशेष म्हणजे यावर कोणाचेही नियंत्रण नाही. कोटय़वधीची मिळकत सापांच्या विषाच्या व्यापारात असल्यामुळे विषाच्या तस्करीत भेसळीचा प्रकारही होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा हा व्यापार होतो तेव्हा भेसळीचे विष रोखण्यासाठी ते पोहोचवणाऱ्याला प्रमाणपत्र सादर करावे लागते. विष भेसळीचे नाही याकरिता पुरावा द्यावा लागतो. हा फक्त सापाच्या विषाबाबत झाले.  ब्रिटनपासून चीनपर्यंत या तस्करीचे धागेदोरे आहेत. विषाप्रमाणेच सापाची कातडी आणि दातांचाही व्यापार होतो. सापाची कातडी ही पर्सेस, पट्टे याकरिता मोठय़ा प्रमाणावर वापरली जाते. या कातडीलासुद्धा लाखो रुपयाची किंमत आहे. सापांच्या विषावर संशोधन करणारी आणि औषधांसाठी विष घेणारी ‘हाफकिन’ ही एकमेव संस्था आहे. मात्र, अनाधिकृतरीत्या सापांच्या विषावर संशोधन करणाऱ्यांची संख्याही वाढत चालली असून यावर वनखात्याचे नियंत्रण नाही.

शस्त्रसज्ज तस्कर

मुंबई शहरातील क्रॉफर्ड बाजारात वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी मोठय़ा प्रमाणावर आहे. येथून सापांची खरेदी-विक्रीच होत नाही तर सापांचे कृत्रिम प्रजननदेखील या ठिकाणी होते. वन्यजीवांशी संबंधीत काही संस्थांनी यावर आळा आणण्याचा प्रयत्न झाला, पण शस्त्रसज्ज तस्करांपुढे त्यांचे काहीही चालले नाही. एवढा मोठा व्यापार या ठिकाणी होत असताना राज्याच्या वनखात्याच्या भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रामुख्याने नागपूर शहरालासुद्धा अनेक राज्याच्या सीमा लागून असल्याने येथूनही हा व्यापार मोठय़ा प्रमाणावर होतो. आंतरराष्ट्रीय तस्करीचे मूळ विदर्भात आहे कारण गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या वनसमृद्ध जिल्ह्य़ात अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या कोब्रासारख्या अनेक प्रजातींचे साप आहेत.

देशांतर्गत तस्करी

अधिकृत कंपन्यांमध्ये विषावर उतारा म्हणून प्रतिविष तयार करण्यासाठी सापांच्या विषाचा वापर केला जातो. अनाधिकृतरित्या मात्र सापाच्या विषाचे दुरुपयोग अधिक होतात. तरुणाई नशेकरिता सापाच्या विषाचा वापर करतात. या पाटर्य़ामध्ये के-७२ आणि के-७६ या नावाने हे विष विकले जाते. त्यामुळे मादक द्रव्याची तस्करी करणारे माफिया विष तस्करीतसुद्धा सहभागी आहेत. सापाच्या विषातील एक विशिष्ट घटक कर्करोगाचे मूळ असलेली गाठ रोखू शकतो, असा समज आहे. चीनमध्ये वाघाच्या हाडांचा ज्याप्रमाणे औषधांमध्ये वापर केला जातो, तसाच वापर सापाच्या विषाचासुद्धा केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातच नव्हे तर देशांतर्गतसुद्धा सापांच्या विषाची तस्करी मोठय़ा प्रमाणावर होते.

देशात सुमारे २५६ प्रकारचे साप आढळून येतात. त्यातील ५५ प्रजाती या विषारी सापांच्या आहेत. नाग, मण्यार, घोणस, फुरसे, हिरवा घोणस, समुद्रसर्प हे विषारी आहेत. तर उर्वरित सर्व प्रजाती धामण, कवडय़ा, डुरक्या-घोणस, नानेटी, हरणटोळ, श्वान सर्प, मंडोल, रुकई, अजगर वगैरे बिनविषारी प्रकारात मोडतात. नाग, मण्यार, समुद्र सर्प यापासून दंश झाल्यास माणसाच्या मज्जासंस्थेवर विषाचा परिणाम होतो. दंशाच्या जागी सूज येऊन बधिरपणा येतो. श्वासोच्छवासाला त्रास होतो. विष हृदयापर्यंत गेले तर रक्ताचे पाणी होऊन पांढऱ्या रंगाचा फेस तयार होतो. तो तोंडावाटे बाहेर पडून श्वास घ्यायला खूप त्रास होतो. शेवटी हृदयक्रिया बंद पडून माणसाचा मृत्यू होतो. त्यामुळे मराठवाडय़ात काही वर्षांपूर्वी एका कृषी अधिकाऱ्याच्या पत्नीने सर्पमित्राला हाताशी धरून पतीला कोब्रा या प्रजातीच्या सापाचा दंश करवला. ही घटना उघडकीस आली तेव्हा गुन्हेगारी क्षेत्रातही आता सापांच्या वापर होऊ लागल्याचे सिद्ध झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on snake poison smuggling
First published on: 27-07-2017 at 03:25 IST