11 December 2018

News Flash

‘झाडीपट्टी रंगभूमी’चे बाजारीकरण!

झाडीपट्टीच्या नाटकांचे अक्षरश: बाजारीकरण झाले

संगीत रंगभूमीची पाश्र्वभूमी असलेल्या झाडीपट्टीच्या नाटकांचे अक्षरश: बाजारीकरण झाले असून अश्लील नृत्ये, विनोद, हिंदी चित्रपटांचा पगडा, गदारोळ, पुण्या-मुंबईच्या कलावंतांचे डोहाळे यामुळे नाटकाचा आत्मा असलेली कथा, कलावंत, संगीत, नेपथ्य आणि सादरीकरणासोबतच दिग्दर्शक नावाचा प्रकार ही रंगभूमी हरवून बसली आहे. त्याचा परिणाम झाडीपट्टीतील नाटकांची अवस्था ‘ना धड दंडार, ना धड नाटक, ना धड लोककला’ अशी झाली असून नवीन पिढीलाही झाडीपट्टीतील नाटक ते हेच का, असा प्रश्न पडला आहे.

शंभर वर्षांची पाश्र्वभूमी असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीचा विस्तार हा पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया, भंडारा या चार जिल्हय़ांत आहे. धानाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झाडीत धान कापणीला सुरुवात होते, त्याच वेळी म्हणजे दिवाळीत भाऊबीजेपासून नाटकांना सुरुवात होते आणि पुढे ती होळी, रंगपंचमीपर्यंत सलग चार महिने सुरू असते. या भागातील शेतकरी दिवसभर शेतात धान कापणी करतो आणि रात्री झाडीपट्टीचे नाटक बघतो. आज टीव्ही, विविध वाहिन्या आणि समाज माध्यमे झाडीपट्टीत पोहोचली असली तरी या कालावधीत हेच त्याचे मनोरंजनाचे मुख्य साधन आहे. संगीत हा झाडीपट्टीचा आत्मा आहे असे म्हटले जाते. झाडीपट्टीने गो. ना. मुनघाटे यांचे खेडय़ातील माणसे, मातीमायचा मुंजा, मडीमायचा भुत्या, महामृत्युंजय मरकडेश्वर, भूक, माझं कुंकू मीच पुसलं, आत्महत्या, भाकर अशी एक नाही तर अनेक दर्जेदार नाटकं आणि कलावंत दिली. मात्र, आज झाडीपट्टी रंगभूमीचे अक्षरश: बाजारीकरण झाले असून झाडीच्या दर्जेदार नाटकांना ‘हंगामा’ या अश्लील नृत्यप्रकाराचे ग्रहण लागले आहे. कथानक हरवून बसलेल्या झाडीपट्टीतील नाटकांमध्ये नेपथ्य व संगीताचा मृत्यू झाला असून डीजे व नृत्याने त्याची जागा घेतली आहे. दिग्दर्शक नावाचा प्रकार नाटकात कुठेच दिसत नाही. पुण्या-मुंबईतील कलावंतांना झाडीपट्टीत आणायचे आणि त्या बळावर बक्कळ पैसा कमवायचा असाच काहीसा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. त्यामुळे झाडीपट्टीतील नाटकांचे गणित बिघडले आहे. आज मुंबईतील मोठे कलावंत झाडीपट्टीत येतात आणि २५ हजार रुपये केवळ फीत कापायचे घेतात.

झाडीपट्टीतील नाटकांना सहकुटुंब जाणेसुद्धा कठीण झाले आहे. इतके विद्रूपीकरण या नाटकांचे झाले आहे. झाडीतील बहुतांश नाटय़ कंपन्यांना सुमार नाटके चालविण्यासाठी पुण्या-मुंबईच्या कलावंतांचे डोहाळे लागले आहे. कंबरे खालचे विनोद संपले म्हणून येथे ‘डान्स हंगामा’ हा अश्लील प्रकार सुरू झाला आहे. झाडीपट्टी रंगभूमी ही झाडीतील निष्ठावंत नाटय़ कलावंतांनी जिवंत ठेवली असली तरी आज त्याचे पूर्णत: विद्रूपीकरण झाले आहे. त्यामुळे नवीन पिढीला नाटक म्हणजेच हेच आहे काय, असा प्रश्न पडला आहे.

संवाद, तोच खलनायक, तोच सावकार आणि तोच नायक व नायिका असे कंटाळवाणे नाटय़ प्रयोग येथे सातत्याने होत आहेत. मुंबईचे पार्सल अर्थात ज्यु. मेहमूद, ज्यु. दादा कोंडके, ज्यु. मकरंद अनासपुरे, ज्यु. लक्ष्मीकांत बेर्डे अशा दुय्यम कलावंतांचेही येथे आक्रमण झाले आहे. त्यामुळे झाडीपट्टीतील कलावंतांना आज खऱ्या अर्थाने नाटकांचा अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र अभ्यास न करताच परीक्षा देण्याचे प्रकार सुरू आहेत.

पुण्या-मुंबईच्या कलावंतांचे आक्रमण

पुण्या-मुंबईत नाटक आणि चित्रपटात काम मिळत नसल्यामुळे तेथील कलावंतांनी झाडीपट्टीत आक्रमण केले आहे. पूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘बिघडले स्वर्गाचे दार’ हे नाटक झाडीपट्टीत सादर केले होते. त्यानंतर प्रशांत दामले, मोहन जोशी, रमेश भाटकर, कुलदीप पवार, अलका कुबल हे नामवंत अभिनेते झाडीत काम करायचे. आता मकरंद अनासपुरे याच्यासह अनेक कलावंत झाडीपट्टीत केवळ पैसा कमावण्यासाठी येत आहेत. या कलावंतांना झाडीपट्टी रंगभूमीशी काही देणे-घेणे नाही.

झाडीपट्टी रंगभूमीची शतकोत्तर वाटचाल

झाडीपट्टीतील नाटकांचा व्यवसाय हा शंभर कोटींच्या घरात आहे. यावर्षी धान पिकाला फटका बसल्याने झाडीपट्टीतील नाटकांना आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे शंभर कोटींची ही बाजारपेठ ८० कोटींच्या आसपास येऊन थांबणार, असा जाणकारांचा अंदाज आहे. पुण्या-मुंबईच्या कलावंतांनी झाडीपट्टीतील नाटकांचे अर्थकारण बिघडविले आहे. धान, सोयाबिन, कापूस ही पिके चांगली झाली की झाडीपट्टीत नाटक हाऊसफुल्ल असतात. येथे कलावंतांनाही एका नाटकामागे एक ते दीड हजार रुपये मिळतात. पुण्या-मुंबईतील कलावंतांना अधिकचे पैसे मिळतात.

वडसा मुख्य केंद्र

हिंदी चित्रपटांचे बॉलीवूड जसे मुंबईत आहे तसेच झाडीपट्टीतील नाटकांचे मुख्य केंद्र वडसा हे आहे. गडचिरोली जिल्हय़ात येणाऱ्या वडसा या छोटय़ाशा शहरात ५० पेक्षा अधिक झाडीपट्टीतील नाटक कंपन्या आहे. या गावात एकाच वेळी अनेक झाडीपट्टीतील नाटकांचे प्रयोग सुरू असतात.

‘आत्महत्या’ला ‘सार्क’चा बहुमान

झाडीपट्टीतील नाटकांचा दर्जा खालावला व त्याचे बाजारीकरण झाले आहे, अशी टीका सर्वत्र होत असली तरी बालाजी पाटील बोरकर स्मृती प्रतिष्ठान, नवरगांव या संस्थेचे प्रमुख नाटय़ लेखक, दिग्दर्शक व अभिनेते सदानंद बोरकर यांनी झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटके दिली. शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे ‘आत्महत्या’, अंधश्रद्धेचा विद्रूप चेहरा दाखविणारे सत्य घटनेवर आधारित ‘माझं कुंकू मीच पुसलं’ आणि निखळ विनोदी ‘अस्सा नवरा नको गं बाई’ अशी एकाहून एक दर्जेदार नाटके दिली. ‘आत्महत्या’ची कथा सार्क आंतरराष्ट्रीय महोत्सवात सदानंद बोरकर यांनी प्रभावीपणे सादर केली. बोरकर यांच्यामुळेच पत्रकार पी. साईनाथ यांनी झाडीपट्टी रंगभूमीची दखल इंग्रजी वर्तमानपत्रांना घेण्यास भाग पाडले. पृथ्वी थिएटरच्या संजना कपूर झाडीपट्टीतील दर्जेदार नाटकं पाहून भारावल्या.

झाडीपट्टीत कलावंत घडणे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. पूर्वी झाडीपट्टीतील नाटकांची तालीम तीन ते चार महिने चालायची. आज आठ ते दहा दिवसांत नाटकाची तालीम होते. पूर्वी दर्जेदार नाटके व्हायची, आता येथे ‘हंगामा’ हा अश्लील प्रकार सुरू झालेला आहे. यामुळे कलावंतांचा दर्जा घसरला आहे. झाडीपट्टीत खऱ्या अर्थाने बाल रंगभूमीची गरज आहे. पुण्या-मुंबईचे कलावंत येथे नाटकांपुरते येतात आणि निघून जातात. त्यांना झाडीपट्टीशी काही देणे घेणे नाही. संगीत हा झाडीपट्टीच्या नाटकांचा आत्मा आहे. मात्र कर्णकर्कश डीजेमुळे हा आत्माही हरवून बसला आहे.  – प्राचार्य श्याम मोहरकर, लेखक

 

First Published on December 8, 2017 3:23 am

Web Title: marathi articles on zadipatti rangbhumi