News Flash

“…म्हणून मराठी लोकांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करावी”; राज ठाकरेंनी मराठी बांधवांना केली विनंती

"मराठीचं काय होणार मराठीचं काय होणार?, याऐवजी..."

फाइल फोटो (फोटो सौजन्य: पीनट्रेसवरील गौतम नाईक यांच्या खात्यावरुन साभार)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त सर्व मराठी भाषिकांनी किमान आपली स्वाक्षरी तरी मराठीमध्ये करा असं आवाहन केलं आहे. दादर येथे मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी स्वाक्षरी मोहीम या कार्यक्रमाला राज यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठी भाषिकांनी आपली स्वाक्षरी मराठीमध्ये केली तर मराठी भाषा टिकण्यास मदत होईल असं मत व्यक्त केलं.

मराठी स्वाक्षऱ्यांच्या मोहिमेचा मराठी संवर्धनासाठी किती फायदा होईल असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज यांनी, कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा घेतला नाहीय असं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना राज यांनी, “दरवर्षी हा कार्यक्रम होत असला तरी या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्याचं ठरवलं. माझी इच्छा आणि आणि विनंतीही आहे मराठी बांधवांना की आपली स्वाक्षरी मराठीमध्ये झाली तर सतत आपल्या मनामध्ये आपण मराठीमध्ये, मराठी भाषेसाठी काहीतरी करतोय याची खूणगाठ बांधली जाते. एक मनात राहतं की मी मराठीत सही करतोय. माझ्या पासपोर्टपासून इतर ठिकाणीही मराठीमध्ये सही आहे. त्यामुळे इतर लोकं जेव्हा बघतात तेव्हा त्यांना पण वाटतं की ही बाबा वेगळी सही आहे. मी माझ्या पत्रातही म्हटलं आहे की प्रत्येक वेळेस असं आसवं गाळतं बसणं की मराठीचं काय होणार मराठीचं काय होणार?, याऐवजी काही गोष्टींची सुरुवात करणं गरजेचं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपली बँक खाती आणि इतर ठिकाणी जाऊन सांगा की आजपासून ही माझी मराठीमधली सही असेल. अशा गोष्टी सुरु झाल्या तरच या गोष्टी (मराठी संवर्धनासंदर्भातील गोष्टी) पुढे जातील,” असं सांगितलं.

“दाक्षिणात्यांसारखा भाषेसंदर्भातील आक्रमकपणा आला तर कोणाला काही बोलावं लागणार नाही. नुसतेच दाक्षिणात्य कशाला तर दोन गुजराती एकत्र भेटतात तेव्हा ते गुजरातीमध्ये बोलतात. मराठी व्यक्ती भेटल्यानंतर हिंदीत बोलतात. तुम्ही विचारा लोकांना ते का असं करतात ते,” असंही राज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:28 pm

Web Title: marathi bhasha din msn chief raj thackeray says marathi people should have their signature in marathi scsg 91
Next Stories
1 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, तर राठोडांना फाडून खाल्लं असतं -चित्रा वाघ
2 Angarki Chaturthi : दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी राहणार बंद तर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातही नियमांमध्ये बदल
3 भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X