‘माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्गलोकाहून थोर मला हिचा अभिमान’..असे अभिमानाने सांगून आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमानाची भावना देणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच २७ फेब्रुवारी, हा दिवस ‘मराठी राजभाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

जे.एस.एम. महाविद्यालयातही हा दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी वाङ्मय व भाषा अभ्यास मंडळातर्फे या निमित्ताने ‘बोला मराठीत’ वक्तृत्व स्पर्धा, स्वरचित काव्यलेखन स्पर्धा, ‘मराठी भाषा संवर्धनाचे उपाय’ या विषयावरील निबंधलेखन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविद्यालयातील िहदी विभागप्रमुख मा. प्रा. डॉ. मोहसीन खान हे प्रमुख पाहुणे म्हणून तर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. अविनाश ओक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या साहित्यलेखनाने मराठी भाषेची सेवा करणाऱ्या साहित्यिकांच्या कार्याचा गौरव करणारी चित्रफीत मराठी अभिमान गीताच्या पाश्र्वभूमीवर दाखविण्यात आली. त्यानंतर प्रियांका पाटील, हर्षला महाजन, विद्याश्री पाटील, अक्षता राणे यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कविता सादर केल्या व उपस्थितांची दाद मिळविली.

या वेळी मा. प्रा. डॉ. मोहसीन खान यांनी मार्गदर्शन करताना भाषा हा जिवंत प्रवाह असून तो अखंड वाहत असतो, त्यात खंड पडू नये म्हणून त्यात येणारी अशुद्धी दूर करून हा प्रवाह निर्मळ राखण्याची जबाबदारी प्रत्येक नीजभाषिकाची आहे, असे उद्गार काढले. मराठी भाषा ही तंत्रज्ञानाची भाषा होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

तर आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. प्राचार्यानी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वानीच प्रामाणिक प्रयत्न करावे असे आवाहन केले.

विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांना पुस्तकरूपाने पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या वेळी महाविद्यालयातील प्रा. भालेराव, प्रा. नीलम म्हात्रे, प्रा. स्नेहा ठाकूर, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. सुप्रिया धुमाळ उपस्थित होते. कु. मनाली घरत हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कु. अक्षता राणे हिने उपस्थितांचे आभार मानले. प्रा. डॉ. नीलकंठ शेरे व प्रा. जयेश म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.