भारतातील वैशिष्टय़पूर्ण भाषांना केंद्र शासनाच्या वतीने अभिजात दर्जा बहाल केला जातो. मराठी भाषेला हा दर्जा प्राप्त व्हावा या साठी राज्य शासनाचा मराठी भाषाविभाग प्रयत्न करत आहे. या साठी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी विषेश प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका पत्राद्वारे केले आहे.
या पत्राद्वारे त्यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा या साठी कळकळीचे आवाहन केले आहे. या पत्रात ते म्हणतात,‘‘मराठी भाषादिवस २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.या पूर्वीच हा दर्जा मिळावा असे उद्दिष्ट मी व माझ्या मराठी भाषा विभागाने ठेवले आहे. या साठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या नावे ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ‘अशी आग्रही मागणी करणारे पत्र आपण स्वत पाठवावे ,तसेच आपल्या भागातील जनतेलाही या उपक्रमात सक्रिय सहभागी करावे आणि अधिकाधिक पत्रे साहित्य अकादमीच्या नावावर पाठवावीत, असे आवाहन तावडे यांनी या पत्रात केले आहे.
पत्राशिवाय ईमेल केला तरी चालेल असे सांगून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर भाषाभिमानाची लाट निर्माण होईल आणि भाषा विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होऊ शकेल, हे सर्व मुद्दे लक्षात घ्यावेत, असे आवाहन त्यांनी आजी- माजी लोकप्रतिनिधींनाही केले आहे.
महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात दर्जा मिळावा या साठी रंगनाथ पाठारे समिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल साहित्य अकादमीला पाठवला आहे. तसेच, केंद्र सांस्कृतिक विभागाकडे ही मागणी पोचली आहे.आता जास्तीतजास्त मराठी बांधवांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा या साठी पाठपुराव्यादाखल पत्रे पाठवावीत, असे विनोद तावडे यांनी आवाहन केले आहे. या पत्राला प्रतिसाद देत मराठी साहित्य परिषद सातारा शाखेच्या वतीने एक हजार पत्रं पाठवण्याचा निर्धार केल्याचे साहित्य परिषद सातारा शाखेचे अध्यक्ष मधुसूदन पतकी यांनी जाहीर केले आहे. मंगळवारपासून पत्रं पाठवण्याच्या अभियानाला प्रारंभ होत आहे.