10 July 2020

News Flash

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’वर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप; म्हणाले, अन्यथा…

नेमकी काय आहे ब्राह्मण महासंघाची भूमिका

आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी ही मागणी केली आहे. सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद सुरु असतानाच आता चित्रपटाच्या नावावरुन नवा वाद सुरु झाला आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

“अश्लील हा शब्द जरी मराठी भाषेत असला तरीदेखील तो उघडपणे आपण उच्चारत नाही. मात्र या चित्रपटाच्या नावातच अश्लील हा शब्द आहे. थोडक्यात, या नावावरुन चित्रपटात काहीतरी अश्लील दाखविण्यात येईल, असं प्रेक्षकांना भासविण्यात येत आहे. तसंच या नावामुळे लोकांची लैंगिक भूक चाळावली जाते. त्यामुळे लोकांमधील विकृतीही वाढताना दिसत आहे”, असं आनंद दवे यांनी सांगितलं

पुढे ते म्हणतात, “चित्रपटाचं नाव पाहिल्यानंतर आम्ही निर्मात्यांना फोन करुन नाव बदल्याची मागणी केली. मात्र प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यामुळे नावात बदल करणं शक्य नसल्याचं निर्मात्यांनी सांगितलं. मात्र आम्ही आमचा विरोध कायम ठेवणार आहोत”.

नाव न बदलल्यास ब्राह्मण महासंघाची भूमिका काय?
“आमचा विरोध हा कायम राहिलं. ज्याला हा चित्रपट पाहायचा आहे त्यांनी तो पाहावा. मात्र आम्ही या चित्रपटाला कायम विरोध करु. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका, नाव बदलण्यामागचं कारण आम्ही लोकांना सांगू. तसंच अशा प्रकारचे चित्रपट पाहू नये असं आवाहनही करु”.

सॉफ्ट पॉर्नची तुमची व्याख्या काय ?
ब्राह्मण महासंघाच्या मते, अश्लील उद्योग मित्र मंडळ हा चित्रपट सॉफ्ट पॉर्न चित्रपट आहे. ‘सॉफ्ट पॉर्न’ म्हणजे पॉर्न चित्रपटांची पहिली आवृत्ती. अशा स्वरुपाचे चित्रपट पाहिल्यानंतर सहाजिकच लोकांमधील विकृती जागी होते आणि समाजात बलात्कार, अत्याचारासारखी प्रकरणे घडतात.
गेल्या काही दिवसापासून अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरण्यात आलेल्या हटके पद्धतीमुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. मात्र आता या चित्रपटावरुन वाद निर्माण झाले आहे. निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. तर आता ब्राह्मण महासंघानेदेखील चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. यापूर्वी ब्राह्मण महासंघाने ‘पद्मावत’, ‘दशक्रिया’ या चित्रपटांना विरोध केला होता.

वाचा : ‘सविता भाभी’ला लीगल नोटीस, ‘अश्लील उद्योग…’ चित्रपट वादात

दरम्यान, ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत अमेय वाघ स्क्रीन शेअर करत आहे. नुकतंच या चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं. मात्र या गाण्यालाही प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 11:02 am

Web Title: marathi movie ashleel udyog mitra mandal opposed by brahman mahasangh ssj 93
Next Stories
1 ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ला ‘सॉफ्ट पॉर्न’ म्हणणाऱ्या ब्राह्मण महासंघाला दिग्दर्शकाने सुनावले, म्हणाला…
2 रश्मी देसाईसाठी ‘या’ अभिनेत्याला खावा लागला मार!
3 मृणाल कुलकर्णीच्या लेकाचं कलाविश्वात पदार्पण; ‘या’ मालिकेत साकारतोय मुख्य भूमिका
Just Now!
X