रस्त्यांच्या कंत्राटात भ्रष्टाचार करून तुम्ही कितीही आरामदायक गाडी घेतलीत तरी तुम्हाला शेवटी याच खड्डेवाल्या रस्त्यांवरुन जायचं आहे, असे ट्विट करत संगीतकार कौशल इनामदार यांनी राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नाराजी व्यक्त केली. मात्र, याचा संदर्भ नेटीझन्सनी आदित्य ठाकरेंच्या गाडीशी जोडला आणि कौशल इनामदारांनी शिवसेनेवर टीका केली, अशी चर्चा सुरु झाली.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. शुक्रवारी नाशिकला जात असताना घोटीजवळ त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे आदित्य ठाकरेंना नाइलाजाने दुसऱ्या गाडीने हॉटेलला पोहोचावे लागले. खड्ड्यांमुळे टायर फुटल्याचे सांगितले जाते.

ही घटना ताजी असतानाच संगीतकार कौशल इनामदार यांनी शनिवारी सकाळी एक ट्विट केले. रस्त्यांच्या कंत्राटात भ्रष्टाचार करून तुम्ही कितीही आरामदायक गाडी घेतलीत तरी तुम्हाला शेवटी याच खड्डेवाल्या रस्त्यांवरुन जायचं आहे, असे त्यांनी यात म्हटले होते.

कौशल यांच्या ट्विटचा संदर्भ नेटिझन्सनी आदित्य ठाकरेंच्या कारशी जोडला. अनेकांनी कौशल इनामदार यांच्या ट्विटचे समर्थन केले. तर काहींनी तुम्हाला भाजपाचा भ्रष्टाचार दिसत नाही का, असा प्रश्न विचारला. अखेर कौशल इनामदार म्हणाले, मी शिवसेनेचे नावही घेतले नाही. आणि खरं सांगायचं तर माझ्या मनातही शिवसेनेचं नाव आलं नाही. मी देवगड ते कोल्हापूर प्रवासात आहे आणि रस्त्याची गत इतकी वाईट आहे की ते ट्विट मी केलं. तुम्ही का उगीच स्वतःवर ओढवून घेताय?, असे त्यांनी म्हटले आहे.