मंगेश पाडगावकर हे चिरंतन तारुण्याची टवटवीत कविता लिहिणारे कवी होते. त्यांची गाणी आणि कविता ही कायम रसिकांच्या ओठांवर अधिराज्य गाजवणारीच आहे. या शब्दात आज येथे श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना आज येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कवी इंद्रजित भालेराव यांनी यावेळी श्रद्धांजली सभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. आपली काव्य प्रकृती अबाधित ठेवून नितांत सुंदर अशी गाणी पाडगावकरांनी लिहिली. त्याचबरोबर संत मिराबाई, कबीर, तुलसीदास यांच्या रचनाही मराठीत आणल्या. त्यांची वाङ्मय संपदा साहित्य समृद्ध करणारी आहे. अशी भावना यावेळी भालेराव यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य देविदास कुलकर्णी, आसाराम लोमटे, मसापचे शाखाध्यक्ष रमाकांत कुलकर्णी, कवी रेणू पाचपोर, केशव खटींग, डॉ. आनंद देशपांडे, राजेंद्र गहाळ, प्रमोद बल्लाळ, महेश देशमुख, अरुण चव्हाळ आदी उपस्थित होते.
नांदेड
विविध पिढय़ांमध्ये कवितेच्या माध्यमातून दृढ नाते जपणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे ३० रोजी सकाळी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल नांदेड जिल्ह्यातील साहित्य वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आला.
प्रा. तु. शं. कुळकर्णी
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने करंदीकर, बापट व पाडगावकर युगाचा अस्त झाला आहे. पाडगावकरांची जिप्सी ही कविता आम्हाला खूपच प्रेरणादायी ठरली. त्यांच्या स्नेहपूर्ण व आनंददायी जीवनातले काही क्षण आमचे जीवनही सोनेरी बनवून गेले. या ज्येष्ठ मित्रास माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
मंगेश पाडगावकर यांचे निधन म्हणजे मराठी कवितेतील आनंदऋतू संपणं होय. मराठी कवितेतील पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर हे तीन प्रतिभावंत कवी म्हणजे त्रिरत्न होय. त्यात पाडगवकर यांच्या प्रेमभाव, निसर्गानुभव आणि मिश्किल विनोदी कविता ही मोत्यांसारखी चमकदार आहे. पाडगावकर यांच्या कवितेने सर्वसामान्य रसिक कवितेशी जोडला गेला आहे. त्यांच्यातील प्रतिभावान कवी, गीतकार आणि एक विदूषक असा त्रिवेणी संगम घडला. कवितेतील गाण्यांशी इमान ठेवणारा, असा कवी पुन्हा होणे नाही.
भगवंत क्षीरसागर
माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी कविवर्य मंगेश पाडगावकर उपस्थित होते. सर्वावर प्रेम करायला शिकविणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. कविता वाचन हा प्रकार लोकप्रिय करणाऱ्या त्रिकुटांमध्ये पाडगावकरांचे योगदान मोठे आहे, हे नाकारता येत नाही. काव्य वाचनाची त्यांची पद्धतही वैशिष्टय़पूर्ण होती.
प्राचार्या गीता लाठकर
काही वर्षांपूर्वी पाडगावकर हे आमच्या शैक्षणिक संकुलास भेट देण्यासाठी आले होते. त्यांची ही भेट अतिशय सुंदर अशी आठवण ठरली आहे. पाडगावकर यांची अप्रतिम लयबद्ध शब्दसंपदा पाहता असा कवी पुन्हा होणे नाही, एवढेच.
देविदास फुलारी
रसिकांना अतिशय प्रिय असलेले कवी आज आपल्यातून निघून गेले याचे दुख वाटते. इतकं दिलंत तुम्ही मला की, माणूस केलंत तुम्ही मला, अशी कविता लिहून आपली प्रतिभा रसिकांच्या चरणावर वाहणारा कवी खऱ्या अर्थाने आयुष्यभर शब्दांचा जागर घालत राहिला. धारानृत्य हा काव्यसंग्रह लिहून ज्यांनी आपल्या वाङ्मयीन वाटचालीची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने ते यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सुरेश सावंत
मंगेश पाडगावकर यांनी बालमानसशास्त्र जाणून मोठय़ांच्या कवितांबरोबरच बालकुमारांसाठीही मोठे साहित्य लेखन केले आहे. पाडगावकरांचे आयुष्य म्हणजे कवितेचा उत्सव होय. बोलगाणी अतिशय लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. या काव्य कोहिनुराला अखेरचा सलाम!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असा कवी होणे नाही
पाडगावकरांच्या जाण्याने मराठी कवितेतील एक पर्व समाप्त झाले आहे. वेंगुल्र्याच्या पावसात वाढलेल्या तृणांकुराचा वटवृक्ष झाल्याचे मराठी कवितेने पाहिले आहे. शेवटच्या काळातही त्यांची लेखणी जागृत राहिली होती. सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या दिवसांमध्येही मराठीतल्या अव्वल दिवाळी अंकांमध्ये पहिल्या पानावर त्यांच्या कविता येत असत. एका बाजूला सुक्ष्मसंवेदना व्यक्त करणारी कविता, गाणी तर दुसऱ्या बाजूला उदासबोध, वात्रटिका अशा विविध शैलीच्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
अत्यंत तरल अशी प्रतिभाशक्ती त्यांना लाभली होती. कवितेबरोबरच त्यांनी केलेले अनुवादही अत्यंत महत्त्वाचे आहेत. नव्या पिढीतील कवींसाठी त्यांनी बहुविध स्वरूपाच्या लेखनाने आदर्श घालून दिला आहे. कोमसापच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना साहेबी थाटापेक्षा रसिक म्हणून संमेलनामध्ये सहभागी व्हावे असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. कवी म्हणून त्यांच्याकडे सत्त्व होते. मंचीय कवी म्हणून त्यांच्यावर कितीही टीका केली तरी त्यांच्या कविता व कार्यक्रमांमुळे त्यांनी गाण्याकडे, कवितेकडे आणले आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आमच्या पिढीतील कवींच्या पाठीवर त्यांचा प्रेमाचा हात नेहमीच होता. त्यांच्या जाण्याने पोरकेपणाची भावना दाटून आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi poet mangesh padgaonkar passed away
First published on: 31-12-2015 at 05:04 IST