पुणे : गेल्या काही काळात इंटरनेट आणि समाजमाध्यमांमध्ये इंग्रजीसह प्रादेशिक भाषांचा वापर सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. इंटरनेटवरील भारतीय भाषांच्या वापरामध्ये हिंदी आघाडीवर असली, तरी हिंदीच्या तुलनेत मराठीचा वापर अधिक काळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बोडो, डोगरी, मैथिली, सिंधी अशा अल्पसंख्य भाषांचाही वापर वाढला आहे.

रेव्हेरी लँग्वेज टेक्नॉलॉजी या कंपनीने जाहीर केलेल्या ‘डिजिटल इंडियन लँग्वेज रिपोर्ट’ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्या भारतीयांच्या इंटरनेटवरील भाषा वापराचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला. इंटरनेटधारकांच्या प्रादेशिक भाषेतील शब्दांच्या वापराच्या सरासरीचा या पाहणीमध्ये विचार करण्यात आला. त्यानुसार हिंदीच्या तुलनेत मराठी, तेलुगूचा वापर अधिक काळ होत असल्याचे दिसून आले.

भारतीय भाषा वापरकर्त्यांमधील जवळपास ६९ टक्के भारतीय निमशहरी आणि ग्रामीण भागातील आहेत. तर, १३ टक्के भारतीय शहरांतील आहेत. प्रादेशिक भाषा वापरकर्त्यांमध्ये जवळपास ९९ टक्के भारतीय स्मार्टफोनवरून इंटरनेट वापरतात. इंटरनेट वापणाऱ्या जवळपास ५० कोटी भारतीयांमध्ये ३० कोटी भारतीय प्रादेशिक भाषांना पसंती देतात.

एकूण भाषांमध्ये हिंदीचा वापर जास्त असला, तरी मराठी आणि तेलुगूचा वापर हिंदीच्या तुलनेत अधिक काळ केला जातो. कारण, तेलुगू आणि मराठी भाषेतील शब्द मोठे असतात. इंटरनेटवर या भाषा वापरण्याचे प्रमाणही जास्त आहे. प्रादेशिक भाषांच्या वापरामध्ये अल्पसंख्य भाषांचाही वाढता वापर लक्षवेधी आहे. भाषा वैविध्य हे भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांचे वैशिष्टय़ ठरते. बहुतांश भारतीय इंटरनेटवर इंग्रजीचा वापर करत नाहीत. इंग्रजीपेक्षा ते मातृभाषेला प्राधान्य देतात. त्यामुळे भारतीय भाषिकांचा समूह तयार झाला आहे. तरीही, भारतीय भाषा आणि भाषिकांना डोळ्यासमोर ठेवून अ‍ॅप्स आणि सेवांची निर्मिती होत नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

५४ टक्के भारतीयांची ‘बजेट स्मार्टफोन’ला पसंती!

भारतीयांकडून महागडय़ा स्मार्टफोनपेक्षा बजेटमध्ये बसणाऱ्या स्मार्टफोनला पसंती मिळत असल्याचेही स्पष्ट झाले. जेमतेम २२ टक्के भारतीय ११ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा स्मार्टफोन वापरतात, तर ५४ टक्के भारतीय ५ ते ११ हजारादरम्यानच्या स्मार्टफोनला पसंती देत असल्याचे या अहवालाद्वारे आढळून आले.