ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांची एक लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोत्तापल्ले यांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली असून या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागनाथ कोतापल्ले यांच्याशी रेणुका आचार्य आणि प्रशांत दीक्षित नामक दोघांनी फोन आणि ईमेलद्वारे संपर्क साधला. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्समध्ये विमा काढल्यास जास्त पैसे मिळतील, असे आमिष त्या दोघांनी कोत्तापल्ले यांना दाखवले होते. आरोपीने कोत्तापल्ले यांना आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात एक लाख रुपये भरायला सांगितले. यानुसार कोत्तापल्ले यांनी पैसे देखील भरले. २४ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत हा सगळा व्यवहार झाला. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोत्तापल्ले यांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी अधिक तपास करत आहे.

एक लाख रुपये भरल्यानंतरही आरोपींनी कोत्तापल्ले यांना आणखी पैसे भरायला सांगितले. यासाठी ते वारंवार फोन करत असल्याने कोत्तापल्ले यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.