करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या लॉकडाउनचा देशभरातील कामगार वर्गाला मोठा फटका बसला. हातावर पोट असणारा कामगार रोजगार व कामधंद्यासाठी इतर राज्यांत कामाला जातो. लॉकडाउनमध्ये सर्व वाहतूक व्यवस्था बंद झाल्यामुळे हे कामगार अडकून पडले होते. अखेरीस केंद्र सरकारने या कामगारांना आपल्या घरी परतण्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली. मुंबई, पुणे, नाशिक यासह महाराष्ट्राच्या महत्वाच्या शहरांमधील परराज्यातील कामगार सध्या आपापल्या गावी परत जात आहेत.

हे कामगार आपल्या गावी परत असल्यामुळे भविष्यकाळात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मराठी मुलांनी या रोजगाराच्या संधींचा फायदा उचलावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. कोणतही काम छोट नसतं, अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

मुंबई,पुणे, नाशिक यासारख्या महत्वाच्या शहरात अनेक छोटे-मोठे उद्योगधंद्यात परप्रांतीय मजुरांचं प्राबल्य आहे. स्थानिकांना नोकरी-धंद्यांमध्ये मिळणारं प्रतिनिधीत्व यावरुन महाराष्ट्रात अनेक पक्ष आंदोलन करत असतात. त्यामुळे भविष्यकाळात मराठी मुलांनी या संधीचा लाभ उचलत स्वत:चा व्यवसाय सुरु केला तर ते खरंच वाखणण्याजोगं असेल.