कोकणात भाजपची राजकीय ताकद नगण्य आहे. त्यामुळे अन्य पक्षांमधील ताकदवान पण असंतुष्टांना आपल्याकडे ओढून बळ वाढवण्याच्या पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार मागील नगर परिषद निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यतील चिपळूणच्या नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार सुरेखा खेराडे यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यावर भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि आधीच्या पाच वर्षांच्या कालावधीत नगर परिषदेमध्ये स्वच्छ व कार्यक्षम कामगिरीचा ठसा उमटवलेल्या खेराडेंना चिपळूणकरांनी नगराध्यक्षपदावर विराजमान केले. २६ सदस्यांच्या या सभागृहात शिवसेनेचे सर्वात जास्त ११ सदस्य असून भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच, राष्ट्रवादी चार आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. यापैकी शिवसेनेचा खेराडेंवर स्वाभाविकपणे राग आहे आणि नगर परिषदेच्या सभागृहाचे कामकाज किंवा कारभारामध्ये गेल्या वर्षभरात वेळोवेळी अडथळे आणत सेना सदस्यांनी तो व्यक्तही केला आहे. गेल्या आठवडय़ात तर प्रशासकीय दप्तरदिरंगाईच्या निषेधार्थ नगराध्यक्षांसह काही नगरसेविका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सभागृहामध्ये अडकवून ठेवण्यापर्यंत या रागाची मजल गेली. विशेष म्हणजे, भाजपचेच सदस्य असलेले उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने हेही स्वकियांवर अधूनमधून शरसंधान साधत अडचणींमध्ये भर घालत असतात. या पाश्र्वभूमीवर गेल्या वर्षभराच्या कंटकमय वाटचालीत न डगमगता खेराडे यांनी स्वच्छतेवर विशेष भर देत बहुचर्चित भुयारी गटार योजना आणि घनकचरा प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी मिळवली. शहरात एलईडी दिवे बसवण्याचे कामही प्राधान्याने चालू असले तरी हितसंबंधी गटांकडून त्यात खोडे घालण्याचे काम चालू आहे. भाजपच्या नगराध्यक्ष आणि नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे.

सरकारकडून आत्तापर्यंत २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे आणि आणखी सुमारे ४२ कोटी रुपयांच्या विकासयोजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

विरोधाचा विकासावर परिणाम नाही

निवडणुका संपल्यानंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहरात विकास घडवून आणण्याचे आवाहन मी सर्वाना केले होते. पण विरोधकांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यांच्याकडून वरिष्ठ पातळीवरून सुडाचे राजकारण चालू आहे. ही तारेवरची कसरत आहे. पण मी अजिबात डगमगणार नाही. त्यांच्या विरोधाचा शहराच्या विकासावर परिणाम होऊ देणार नाही. तसेच सभागृहातील कामकाजामध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वसाधारण सभेच्या वेळी नागरिककक्षही सुरू करणार आहे.    – सुरेखा खेराडे, नगराध्यक्षा, चिपळूण