मराठवाडा ऑटो क्लस्टरमधील सुविधांचा लाभ घेण्यासाठी तब्बल २२३ कंपन्या पुढे आल्या आहेत. लोखंडी प्लेट्स कापणे, उत्पादनापूर्वी लागणारी यंत्रसामग्रीवरील प्रयोगाला त्यामुळे गती आली असल्याचा दावा क्लस्टरच्या संचालकांनी बुधवारी केला.
हव्या त्या आकारात लोखंडी पट्टी कापणे हा प्रकार एवढा अवघड होता, की त्यासाठी पुणे येथे लोखंड पाठवावे लागे. तो वेळ थेट नफ्यात रूपांतरित होत असल्याने उद्योजकांना कोटय़वधी रुपयांचा फायदा झाला आहे. मराठवाडय़ातील ऑटो क्लस्टरमध्ये प्रोटोटाईप मशीन असल्याने संकल्पित यंत्र बनविण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ८३ कोटींचा हा प्रकल्प आता पूर्ण ताकदीनिशी सुरू होणार आहे. विशेषत: लष्कर व रेल्वेसाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी लागणारे अभियांत्रिकी कौशल्य औरंगाबाद येथे उपलब्ध असल्याने त्याचे प्रदर्शन थेट संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दाखविण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान सहज उपलब्ध होत नसल्याने मराठवाडय़ातील छोटय़ा-मोठय़ा उद्योगांना पुणे व मुंबई येथे जावे लागत होते. संकल्पित यंत्रसामग्री बनविण्यासाठी चार-चार महिन्यांचा वेळ लागे. तो वेळ कमी व्हावा, अशी यंत्रसामग्री आता कार्यान्वित झाली आहे. लेसर कटिंग मशीन व कटिंग-सिल्टींग मशीनमुळे उद्योगाची गती वाढू शकेल, असा दावा मराठवाडा ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष राम भोगले यांनी केला. अडीच हजार टन स्टील हव्या त्या आकारात कापून देण्याची सोय करतानाच अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्येक मोजमाप करण्यासाठी आवश्यक त्या मशीन उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर २० अंश तापमानावर मोजमाप घेतले जाते. अगदी मायक्रॉन परिमाणातील मोजमापे विविध यंत्राद्वारे घेता येत असल्याने औरंगाबादमध्ये पुढच्या काळात अगदी छोटे सुटे भाग आणि लष्कराला आवश्यक असणारे मजबूत आणि मोठी उत्पादने बनविणेही शक्य होणार आहे. ही उत्पादने तयार करण्यापूर्वी हुबेहूब यंत्र बनवून त्यावर प्रयोग करणे ही प्रक्रिया सहज सुलभ झाली आहे.
पुणे, नाशिकच्या तुलनेत मराठवाडय़ातील ऑटो क्लस्टरमध्ये नवे बदल करण्यात आले आहेत. त्याचा फायदा आता शहरातील कंपन्या घेत आहेत. मात्र, अधिक व्यवसाय वाढावा या साठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीत औरंगाबादच्या उद्योगाने शिरावे म्हणून उद्योगाच्या क्षमता प्रदर्शित केल्या जाणार आहेत. मराठवाडा ऑटो क्लस्टर हे उत्कृ ष्टता केंद्र म्हणून विकसित झाल्याचा दावा करण्यात आला आहे.