मराठवाडय़ात ‘साखरमाया’ वाढत गेली, तसतसे मराठवाडय़ाचा ‘टँकरवाडा’ झाला. मागील दशकभरातील टँकरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास टँकरला मराठवाडय़ाचे बोधचिन्ह बनविता येईल, अशी स्थिती आहे. दहा वर्षांपूर्वी (२००३-०४) मराठवाडय़ातील १ हजार ८२१ गावांमध्ये २ हजार ७ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. या वर्षी ३० एप्रिलपर्यंत २ हजार १९६ गावांमध्ये २ हजार ३७१ टँकर सुरू होते. गेल्या ५ वर्षांत वाढलेले साखर कारखाने आणि उसाचे क्षेत्रही वाढतच गेले. जेव्हा जेव्हा टंचाई स्थिती निर्माण होते, त्याच्या पुढील वर्षांत काही अंशाने साखरेचे प्रमाण घटते. मात्र, लगेच पुढच्या दोन वर्षांत ऊस वाढविण्यासाठी प्रयत्न होतात आणि टँकरही वाढतात.
पाऊस कितीही पडो, मराठवाडय़ात १० वर्षांत टँकर लागलेच नाहीत, असे एकही वर्ष नाही. सन २००३-०४ मधील पाणीटंचाई तुलनेने अधिक होती. परभणी वगळता अन्य सर्व जिल्ह्य़ांत टँकर लावावे लागले. बीडमध्ये तेव्हा ६१३ टँकर होते. जून महिन्यात बीडमध्ये ५४६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विशेष म्हणजे याच आठवडय़ात ४१६ टँकर कमी झाले. तीव्र पाणीटंचाई संपल्यानंतर पुढच्या वर्षांत (२००४-०५) १ हजार ३०५ टँकर मराठवाडय़ात होते. ही संख्या सरासरी हजाराच्या घरात असल्याचे दिसून येते.
गेल्या दहा वर्षांत २०१०-११ मध्ये चांगला पाऊस झाला होता. तेव्हा केवळ १८० टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. या वर्षी तर धरणांमध्ये पाणीसाठाच नव्हता. परिणामी एप्रिलमध्ये टँकरची संख्या २३७१ पर्यंत गेली होती. मागील दहा वर्षांत पावसाचे सरासरी प्रमाण फक्त दोन वर्षांत खूप कमी होते.  गेल्या वर्षी ८८९ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. अ‍ॅप्रोच चॅनेल, कोरडय़ा धरणांमध्ये पाणी शोधण्यासाठी कसरत केल्यानंतर या वर्षी कसेबसे टँकरला पाणी मिळाले. दरवर्षी अशी स्थिती नसते. चांगला पाऊस नसतानाही टँकर कायम असतो. काही गावांमध्ये पाणीपुरवठय़ाच्या योजना व्यवस्थित चालविल्या जात नाहीत. त्याचाही उपयोग टँकर लॉबीला होत असतो. जलस्वराज्य, भारत निर्माण या महत्त्वाकांक्षी योजना गेल्या दहा वर्षांत सुरू होत्या. या दोन्ही योजनांचा उद्देश टँकरमुक्तीचा होता. मात्र, त्या अयशस्वी ठरल्या. नेहमीप्रमाणेच पाणीयोजनांची वीजदेयके थकीत आहेत. पाणी घ्यायचे ठरले होते, ते स्रोत ठराविक कालावधीनंतर आटतात. नव्याने योजना करावी लागते. आता तर भूगर्भातील पाणीउपसा करण्यातही मराठवाडा आघाडीवर आहे. काही जिल्ह्य़ात पाणी उपसा करण्याची सरासरी एक हजार फुटापर्यंत खोल गेली आहे. आजही टँकर कायम आहे.
टॅंकर लॉबीसाठी ऊस वरदान
एरवी मराठवाडय़ातील नेत्यांनी उसाला मात्र चांगले प्रोत्साहन दिले. सन २००६-०७ मध्ये सुमारे २२७ लाख टन उसाचे गाळप झाले. पुढील वर्षी १८० लाख टन उसाचे गाळप झाले. एखादे पाणीटंचाईचे वर्ष सोडल्यास सरासरी गाळप वाढत गेले. मागील दोन वर्षांपासून ते काहीसे घटले असले, तरी ऊस पिकावरची मायाच टँकर लॉबीसाठी वरदान ठरत आहे. दर चार वर्षांनी ऊस अतिरिक्त होतो. पण टँकर मात्र दरवर्षी कायम आहे. अधिक पाऊस झाल्यानंतरदेखील मराठवाडय़ातील पाणीटंचाई कधी हटलीच नाही.