नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांच्या वादात प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचा बळी गेल्याने भाजपमधील वैदर्भीय नेते अस्वस्थ असून मराठवाडय़ाच्या ‘ब्लॅकमेलिंग’ला पक्षश्रेष्ठी आणखी किती काळ बळी पडणार? असा सवाल आता या नेत्यांच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र, कोणत्याही वादात अडकण्यास नकार देत फडणवीसांना पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली आहे.
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून गुरुवारी आमदार देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती जाहीर झाली असली तरी ज्या पद्धतीने मुनगंटीवार यांना या पदावर दुसऱ्यांदा संधी नाकारण्यात आली, त्यावरून पक्षाच्या वैदर्भीय नेत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी हा प्रश्न खूपच प्रतिष्ठेचा केल्याने गडकरी व त्यांच्या समर्थकांना माघार घ्यावी लागली हे आता स्पष्ट झाले असले तरी मराठवाडय़ाच्या या ब्लॅकमेलिंगला आणखी किती काळ बळी पडायचे, असा प्रश्न आता विदर्भातील नेत्यांच्या वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मराठवाडय़ात पक्षाची कामगिरी अतिशय लाजीरवाणी राहिली आहे. यावर आत्मचिंतन करण्याऐवजी पक्षाचे नेते पदासाठी प्रतिष्ठा पणाला लावण्यात गुंग असल्याचे चित्र अध्यक्षपदाच्या वादातून राज्यात निर्माण झाले. हा प्रकार योग्य नव्हता, अशी भूमिका आता विदर्भातील नेते मांडू लागले आहेत. मुंडे यांचा अपवाद वगळता मुनगंटीवार यांच्या नावाला राज्यातील एकाही नेत्याचा विरोध नव्हता.
केवळ एका व्यक्तीच्या हट्टाखातर पक्षाला किती काळ फरफटत नेणार, असा सवाल आता नेत्यांच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे.