लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठवाडय़ात आचारसंहिता भंगाचे ३२६ गुन्हे दाखल झाले. गुन्ह्य़ांची सर्वाधिक संख्या औरंगाबादच्या ग्रामीण भागात आहे. मतदानाच्या दिवशी सर्वाधिक ४९ गुन्हे नोंदविण्यात आले. तर हिंगोली जिल्ह्य़ात सर्वात कमी ९ गुन्ह्य़ांची नोंद आहे.
आदर्श आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यात फारसे नुकसान होत नाही. आतापर्यंत कोणाला शिक्षा झाल्याचेही ऐकिवात नसल्याने राजकारण्यांनी आचारसंहिता भंग झाला तरी चालेल, अशाच पद्धतीने प्रचार केला. राजकीय पक्षांनी पोलचीट वापरू नयेत, अशा सूचना होत्या. त्यावर उमेदवाराचा चेहरा अथवा पक्षाचे चिन्ह दिसू नये, असे कळविण्यात आले होते. मात्र, सर्व मतदारसंघात सरसकट या नियमाचे उल्लंघन करण्यात आले. काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. तर काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. औरंगाबादच्या ग्रामीण भागात मतदानाच्या दिवशी ४९ गुन्हे नोंदविण्यात आले. झेंडे घेऊन फिरणारे कार्यकर्ते व पोलचीट वाटणाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले. तुलनेने औरंगाबाद शहरात केवळ १४ गुन्हे दाखल झाले. बीड लोकसभा मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत होती. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा वारंवार भंग होईल, असे वातावरण होते. प्रत्यक्षात आचारसंहिता भंगाचे १४ गुन्हे दाखल आहेत. जालना जिल्ह्य़ात-३५, परभणी-५८, उस्मानाबाद-४१ व लातूरमध्ये ३४ गुन्हे दाखल आहेत.