न पेरलेली उघडीबोडकी शिवारे, सोमवारी रात्री झालेला जोराचा पाऊस या पाश्र्वभूमीवर सुरू झालेल्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी सवाल करीत होते आणि अधिकारी सकारात्मक पाऊल उचलू, असे आश्वासन देत होते. सोमवारी रात्री मराठवाडय़ातील ६२ तालुक्यांत किमान एक ते कमाल ३७ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे बदललेल्या वातावरणात दुष्काळग्रस्त भागातील पिकांची दुष्काळ अतिरिक्त आयुक्त राघवेंद्र सिंग, तसेच राष्ट्रीय फलोत्पादन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आर. के. सिंग यांनी पाहणी केली. काही ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.
मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भागात कोणत्या कायमस्वरूपी योजना तयार करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी सोमवारी दोन सदस्यांचे पथक दाखल झाले. औरंगाबाद जिल्ह्यात कमी पाऊस झालेल्या पठण तालुक्याच्या ढोरकीन व कारकीन भागात त्यांनी भेटी दिल्या. मंगळवारी ढगाळ वातावरणातच पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. कारकीन गावातील प्रकाश तुकाराम भडके या शेतकऱ्याशी पथकातील सदस्यांनी चर्चा केली. पाच एकरात ३३ हजार रुपये गुंतवून पेरलेले सोयाबीन वाया गेल्याचे त्यांनी सांगितले.
चौऱ्याहत्तर जळगाव येथे राम पाटील एरंडे यांनी विचारलेल्या प्रश्नापुढे पथकाच्या हाती माना डोलावण्यापलीकडे काही शिल्लक नव्हते. ते म्हणाले की, बँकांनी सरसकट सर्वाना नोटिसा दिल्या. हातात पीक नाही. या वर्षी ते हाती येण्याची शक्यताही नाही. सांगा कसे जगायचे? आता आत्महत्या करणे तेवढे बाकी राहिले आहे. किमान कर्ज माफ झाले तरच जगता येईल. हीच मागणी पुढे रेटत जायकवाडी पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली रहाटगाव येथे पथकाच्या सदस्यांना अडविले. कर्जमाफी झाल्याशिवाय शेतीतील प्रश्न सुटणार नाहीत, असे ठणकावून सांगितले.
तत्पूर्वी कारकीन शिवारात शेख रफी शेख यांनी मांडलेली समस्या अधिकाऱ्यांना निरुत्तर करणारी होती. शेख म्हणाले की, २०११ मध्ये वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला होता. वीज काही मिळाली नाही. विहिरीला पाणी आहे, पण ते काढताच येत नाही. ही समस्या सोडवू, असे उपस्थित विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी प्रश्न विचारत होते आणि पथकातील अधिकारी लक्ष घालू, सकारात्मक काहीतरी करू, अशी उत्तरे देत होते.