मराठवाडय़ात टंचाईचा फेरा..

प्रदीप नणंदकर, लातूर</strong>

मराठवाडय़ावर या वर्षी पावसाची अवकृपा जाणवत आहे. आठ जिल्ह्य़ांपैकी नांदेड आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता उर्वरित सहा जिल्ह्य़ांत पावसाची सरासरी केवळ ६० टक्के आहे. ७६पैकी १३  तालुक्यांत सरासरीच्या निम्म्यानेही पाऊस पडलेला नाही.

प्रशासकीय भाषेत सांगायचे तर ४२१ महसूल मंडळांपैकी तब्बल ६० मंडळात ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस आहे. पावसाच्या या अवकृपेमुळे पिण्याच्या पाण्याचे संकट, जमिनीतील पाणीपातळीत घट आणि शेतमालाच्या उत्पादनातील घट; असा त्रिस्तरीय दुष्काळ मराठवाडय़ाच्या वाटय़ाला आला आहे.

परतीचा मान्सून संपला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे आता पावसाच्या आशा मावळल्या आहेत. आगामी जून महिन्याच्या पावसाला तब्बल नऊ महिने आहेत. इतक्या कमी पावसावर अगामी नऊ महिने काढायचे कसे, असा मोठा प्रश्न आहे.

पावसाच्या चार महिन्यांत केवळ ३० ते ३५ दिवसच पाऊस झाल्याने सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद ही खरीप हंगामातील प्रमुख पिके हाती धड आलीत नाहीत.

औरंगाबाद जिल्हय़ातील अनेक तालुक्यांत खरिपाची पेरणीच करता आली नाही. ज्या ठिकाणी पेरणी झाली तिकडे  पुन्हा खंड पडल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले. दुबार पेरणीनंतर पुन्हा पडलेल्या खंडामुळे पीकच पोसले नाही तर काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे काडच केवळ शिल्लक राहिले. कापसाची अवस्थाही वेगळी नाही. उत्पादनात या वर्षी ५० टक्क्यांपेक्षा अधिकची घट आहे.  आगीतून उठून फुफाटय़ात पडावे त्याप्रमाणे इतके कमी उत्पन्न होऊनही बाजारपेठेत हमीभावाची रक्कमही मिळत नाही.

उस्मानाबाद जिल्हय़ातील रब्बी हंगामातील परंडा परिसरातील ज्वारीला महाराष्ट्रभर मागणी असते. या वर्षी रब्बी हंगामाची ज्वारी इतिहासजमा होईल. खरीप हंगामातील तुरीचे क्षेत्रही मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणावर आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे फुले येण्याच्या स्थितीत असणारे तुरीचे उत्पन्न हाती लागण्याची शक्यता कमी आहे. नांदेड जिल्हय़ातील देगलूर, बिलोली व मुखेड या तीन तालुक्यांत पाऊस अतिशय कमी आहे. देगलूर तालुक्यात ३९.८० टक्के इतकाच पाऊस झाला आहे. गेली दोन वष्रे पाऊस चांगला झाल्यामुळे संपूर्ण मराठवाडाभर उसाच्या लागवडीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. मात्र, या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरीही मोठय़ा संकटात सापडला आहे.

औरंगाबाद जिल्हय़ातील काही गावांत खरिपाची पेरणी नाही. पैठण तालुक्यातील लोहगाव, बालानगर, बिडकीन, ढोरकीन या महसूल मंडळात पाऊस तसा झालाच नाही. परिणामी, पेरणीही झाली नाही. हाती पीक नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाडय़ात १४.५३ लाख हेक्टरवरील कापूस हाती येण्याची शक्यता नाही. जेथे थोडीफार वाढ झाली आहे त्यावर बोंडअळी असल्याने हाती काही येणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

पीक न वाढल्याने भविष्यात चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

दुष्काळझळा..

० मराठवाडय़ात मोठी ११ धरणे, त्यातील सीना कोळेगाव, मांजरा व माजलगाव या तीन धरणांत उपयुक्त पाणीसाठा केवळ शून्य टक्के आहे.

० येलदरी धरणात पाणीसाठा ९.४५ टक्के, निम्न दुधना धरणात २३.११ टक्के तर विष्णुपुरी धरणात पाणीसाठा ९३.२७ टक्के आहे.

० सर्व धरणातील सरासरी पाणीसाठा ३६.४७  टक्के आहे. मध्यम आणि लघू प्रकल्पातील पाणीसाठा सरासरी २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

० मराठवाडय़ाचे वार्षकि पर्जन्यमान ७७९ मि.मी. इतके असून या वर्षी आतापर्यंत केवळ ४९६ मि.मी. म्हणजे सरासरी ६३.६८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे.

० बीड जिल्हय़ात सर्वात कमी म्हणजे ४९.४१ टक्के इतकाच पाऊस आहे. उस्मानाबाद जिल्हय़ातील परंडा तालुक्यात केवळ ३८.४७ टक्के पाऊस झाला आहे.

मराठवाडा नव्हे, टँकरवाडा!

औरंगाबाद जिल्हय़ात गेल्या उन्हाळ्यापासून पिण्याच्या पाण्याचे १५०पेक्षा अधिक टँकर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा हा ‘टँकरवाडा’ म्हणून बदनाम होईल, अशीच भीती आहे.