मराठवाडय़ातील दुष्काळाची स्थिती गंभीर असून, एकरी सरासरी २५ ते ६० हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने पॅकेज द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली जाणार आहे. शिवसेनेच्या २१ आमदारांनी मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. त्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांनाही तो सांगितला जाईल, असे खासदार अनिल देसाई व चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर शेतकरी हवालदिल झाल्याचे देसाई यांनी सांगितले. पाण्याचे चित्र विदारक आहे. दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत असली, तरी शेतकऱ्यांना भेटायला, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला आघाडी सरकार पुढे येत नाही. या सरकारने कधीच जबाबदारी सांभाळली नाही. आताही तेच होत असल्याचा आरोप देसाई यांनी केला.
पिकांचे नुकसान आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर असल्याने त्याचा अहवाल उद्धव ठाकरे यांना दिला जाईल. त्यानंतर पक्ष म्हणून होईल तेवढी मदत करू, असेही ते म्हणाले. गारपिटीचे पैसे देताना दुजाभाव करण्यात आला. काहीजणांना पैसे मिळाले, तर काहींना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनाही भेटणार असल्याचे खासदार खैरे यांनी सांगितले.
या दौऱ्यात कोठेही राजकीय चर्चा केल्या नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. ते केंद्रीय कृषिमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. त्यांनी या भागाचा दौरा करावा, अशी अपेक्षा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच व्यक्त केलेली असल्याने त्यांनी मराठवाडय़ाचा दौरा करावा यासाठी प्रयत्न करू, असे खैरे यांनी सांगितले.
‘उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री’
महायुतीत सर्वकाही नीट सुरू आहे. तशी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही चर्चा झाली आहे. १५० पेक्षा अधिक जागा निवडून आणायच्या, असा शिवसेनेचा संकल्प आहे. लोकसभेत भाजपला अधिक जागा आणि शिवसेनेला कमी, तर विधानसभेला शिवसेनेला अधिक जागा असे सूत्रच ठरले आहे. ज्यांची संख्या अधिक त्यांचा मुख्यमंत्री असेल. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील. त्यांचे नेतृत्व महायुतीने स्वीकारले असल्याचा दावा खैरे यांनी केला. अपक्ष आमदार प्रशांत बंब यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या कोर्टात असल्याचे खैरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पैठणची जागा राष्ट्रीय समाज पक्षाने मागितली आहे. तेथून प्रल्हाद राठोड इच्छुक आहेत. मात्र, त्यांना शांत केले जाईल, असेही खैरे म्हणाले.