औरंगाबाद : दुष्काळावर मात करण्यासाठी मागेल त्याला शेततळ्याची योजना सुरू झाल्यानंतर मराठवाडा त्यात अग्रेसर होता. आता या योजनेत तो आरंभशूर ठरावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ३९ हजार ६०० शेततळे बांधायचे उद्दिष्ट होते. त्यासाठी अर्ज आले ९९ हजार. मंजुऱ्या दिल्या ७४ हजार शेततळ्यांना आणि आता ३० हजार ६४१ शेततळी तयार झाली आहेत. मराठवाडय़ाच्या तुलनेत नगर आणि नाशिक जिल्ह्य़ाने आघाडी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्य़ातही शेततळ्यांची संख्या वाढते आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील गंगापूर आणि वैजापूर हे दोन तालुके वगळता अन्यत्र शेततळ्यांची कामे कासवगतीनेच सुरू होती. मात्र, जलयुक्त शिवार आणि शेततळे करण्यात हा विभाग कसा पुढे आहे, यासह विविध योजनांमध्ये आपणच पुढे आहोत, असा दावा करत ‘कॉलेज-नॉलेज-व्हिलेज’ असे नवे घोषवाक्य करत महाविद्यालयांसमोर योजनांचे सादरीकरण केले जाणार आहे.

५० हजार रुपयांत शेततळे करता येईल असे सांगत तयार करण्यात आलेल्या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. प्रतिसादही चांगला मिळाला. पण निवडक तालुके वगळता शेततळ्यांचे काम मराठवाडय़ात फारसे पुढे सरकले नाही. औरंगाबाद जिल्ह्य़ात ८ हजार २३० शेततळे करण्यात आले. मराठवाडय़ातील अन्य सात जिल्ह्य़ांमध्ये योजनेची अंमलबजावणी तशी गतीने झाली नाही. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात म्हणजे फुलंब्री तालुक्यात केवळ ३२० शेततळे झाले. सोयगावमध्येही केवळ ८६ शेततळे झाले. मात्र, औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांतील शेततळ्यांची संख्या हजाराच्या वर गेली. जालना जिल्ह्य़ात भोकरदन आणि जालना या दोन तालुक्यांत शेततळ्यांची संख्या एक हजारांपेक्षा जास्त आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक १८८६ शेततळे करण्यात आलेला मतदारसंघ भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांचा आहे.

तुलनेने बीड जिल्ह्य़ातील शेततळ्यांची संख्या सर्व तालुक्यांमध्ये समतोल राखणारी आहे. गेवराई, माजलगाव, परळी आणि वडवणी हे तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये म्हणजे बीड, केज, आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई, शिरूर या तालुक्यांमध्ये सरासरी ५०० ते ९०० एवढे शेततळे घेण्यात आले.

नांदेड जिल्ह्य़ात मात्र शेततळ्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही किंवा या तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी शेततळे करावेत यासाठी त्यांचे प्रबोधन केले नाही. परिणाम असा झाला की, मुखेड तालुक्यात केवळ दोन शेततळे पूर्ण झाले. नांदेडमध्ये २४, अर्धापूरमध्ये १२, नायगावमध्ये ३६ अशी सर्वात कमी नांदेड जिल्ह्य़ात शेततळ्यांची संख्या आहे. परभणी जिल्ह्य़ातील पाथरी तालुक्यात महिला कृषी साहाय्यकांनी मोठय़ा प्रमाणात शेततळे केले. मात्र, जिल्ह्य़ात अन्य तालुक्यांमध्ये शेततळे झाले नाहीत.

काही तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी ही योजना अंमलबजावणीत आणण्यासाठी पुढाकार घेतला. तर काही तालुक्यांतील अधिकारी ढिम्मच राहिले. असे असले तरी प्रशासकीय पातळीवर कोणावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीचे काम नव्याने सांगण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

मराठवाडय़ासाठी उपयुक्त ठरणारी योजना नाशिक आणि नगर जिल्ह्य़ात आता जोर धरू लागली आहे. नाशिकमध्ये ६ हजार ८६९ शेततळी पूर्ण झाले आहेत. तर अहमदनगर या योजनेत आघाडीवर आहे. ८ हजार ४३६ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. दोन पावसांत मोठे अंतर पडले की, शेततळ्यांतील पाण्याचा उपयोग करावा असे अपेक्षित असते. ज्या जिल्ह्य़ांमध्ये पाऊस झाला त्या जिल्ह्य़ात शेततळ्यांची संख्या कमी होती आणि जेथे पाऊस झाला नाही तेथे शेततळ्यांची संख्या जास्त आहे.

राज्यात पूर्ण झालेल्या शेततळ्यांची विभागनिहाय माहिती

कोकण विभाग : दोन हजारांपैकी ९०५

नाशिक विभाग : १३ हजारांपैकी ९६०२

पुणे विभाग : १९ हजार ७०० पैकी १५८४०

कोल्हापूर विभाग : ६ हजार ८२० पैकी ५३९१

औरंगाबाद विभाग : २१ हजार ६०० पैकी २१ हजार ६८

लातूर विभाग : १८ हजारांपैकी ९७०२

अमरावती विभाग : १९ हजार ४०० पैकी १७ हजार ३५८

नागपूर विभाग : ११ हजार ७९१ पैकी ८ हजार ३५७