हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला दिल्याने मराठवाडय़ात राष्ट्रवादीचा टक्का कमी झाला आहे. पूर्वी काँग्रेस व आघाडीत प्रत्येकी ४-४ मतदारसंघांची वाटणी होती. आता ती ५-३ अशी झाली आहे. उस्मानाबाद, परभणी व बीड या ३ मतदारसंघांत स्वत: शरद पवार यांनी दौरा केला. बीड मतदारसंघात पाय रोवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली राजकीय मशागत फायद्याची ठरेल, असे चित्र निर्माण केले गेले असले, तरी येथे तुल्यबळ लढत होईल का, याची चाचपणी शरद पवार यांनी सोमवारी केली. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या घरी त्यांनी भोजन घेतले, तर ते आष्टी येथे मुक्कामाला थांबणार आहेत.
िहगोलीत माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी गेले वर्षभर दौरे केले. उमेदवारी मिळालीच तर तयारी असावी, असा यामागे उद्देश होता. मात्र, आता त्यांच्याकडे जबाबदारी कोणती, हा प्रश्न अनुत्तरित आहे. एक मतदारसंघच कमी झाल्याने त्याची भरपाई विधानसभेत करण्याचा मानस असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तथापि, वाटय़ाला आलेल्या ५ जागांपैकी काँग्रेस किती जागा राखते, यावर मराठवाडय़ातील राजकारण अवलंबून असेल. मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
आमचे हिंगोलीचे वार्ताहर तुकाराम झाडे कळवितात की, माजी खासदार शिवाजीराव माने, तसेच शिवसेनेच्या दोन माजी आमदारांनी मनसेत जागा मिळू शकते का, याची चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सूर्यकांता पाटील, माजी खासदार माने, अॅड. शिवाजीराव जाधव हे प्रमुख पदाधिकारी नाराज झाले आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार गजानन घुगे व इतर काही प्रमुख राजकीय पुढाऱ्यांची बठक झाली. मात्र, या बैठकीचा गाजावाजा होऊ नये, असेही प्रयत्न झाले. एवढेच नाही, तर माजी आमदार घुगे व मुंदडा यांनी वानखेडे यांच्याऐवजी इतरांना उमेदवारी द्यावी, या साठी पक्षाचे राजीनामेसुद्धा पूर्वीच पाठविले होते. शनिवारी िहगोली, वसमत, कळमनुरी येथे जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत व विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांनी घेतलेल्या बठकीकडे मुंदडा, घुगे व जि. प.अध्यक्षांनी पाठ फिरविली होती. त्यांच्या गैरहजेरीचे अर्थ लावले जात आहेत.