सरासरीच्या ३९.२५ टक्केच पाऊस; १० हजार हेक्टरवरील पिके वाया

औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाडय़ातील तीन जिल्ह्य़ांवर दुष्काळछाया अधिक गडद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ ३९.२५ टक्के पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्य़ांतील पिके नाजूक स्थितीत आहेत. विशेषत: औरंगाबाद तालुक्यातील पिकांची स्थिती कमालीची चिंताजनक आहे. वैजापूर तालुक्यातील शिऊर आणि नायगाव मंडळातील पिके कोमेजली असून विरोळा, वळण, कवीटखेडा या गावांमध्ये दुबार पेरणीचे संकट आले आहे. वैजापूर तालुक्यातील २४ गावांमध्ये ९ हजार ५६५ हेक्टरवरील पिके पूर्णत: वाया गेली असून येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर फुलंब्री, गंगापूर, सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील पिके जगणार नाहीत. मराठवाडय़ातील पिकांच्या अवस्थेबाबतचा अहवाल नुकताच राज्य शासनाला देण्यात आला असून टँकरच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.

फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा, पैठण तालुक्यातील लोहगाव, बालानगर, बिडकीन, ढोरकीन या गावांमध्ये तर पेरणीच होऊ शकली नाही. चार महसूल मंडळातील ११ गावांमध्ये पाऊस न झाल्यामुळे ६८६ हेक्टर पिके वाया गेली आहेत. गंगापूर तालुक्यातील भेंडाळा, मांजरी, शिंदूरवादा, वजनापूर, कायगाव, शेकटा या गावांमध्ये पिकांची स्थिती नाजूक आहे. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड आणि बोरगाव या गावांमधील पिके आता माना टाकू लागले आहेत. दोन-तीन दिवसांत पाऊस नाही आला तर पिके वाया जातील, असे कृषी विभागातील अधिकारी सांगतात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २२ ऑगस्टपर्यंत पाऊस येण्याची शक्यता नाही, असे सांगितले जात आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असते, पण पाऊस काही येत नाही. एखादी श्रावणसर काही मिनिटांतच संपून जाते. त्याचा पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही, असे सांगितले जात आहे. काही मंडळांमध्ये पिके काढून टाकली जात आहे. किमान रब्बीसाठी पुन्हा जमीन तयार करू, असे म्हणत कोमेजलेली पिके काढण्याचा सपाटा गावोगावी दिसून येत आहे.

बीड जिल्ह्य़ातही हलक्या जमिनीवरील पिके कोमेजली असून वाढ खुंटली आहे. जालना जिल्ह्य़ात सर्वत्र बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून जेथे थोडाफार पाऊस झाला तेथे पिकांवर कीड आली आहे. सोयाबिनवर तुडतुडा, शेंदरी बोंडअळी, मावा या किडींमुळे सगळीच पिके धोक्यात आली आहे.

टँकरची संख्या वाढली

या वर्षी औरंगाबाद जिल्ह्य़ातील टँकर तसे हटलेच नाही. ३६१ टँकरने आजही पाणीपुरवठा केला जातो. मराठवाडय़ात आजघडीला ४३५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या आठवडय़ात ही संख्या ३८० एवढी होती. आठवडय़ाभरात त्यात ५५ची वाढ झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ओरड सुरू झाल्याने खासगी विंधन विहिरीही अधिग्रहित करण्यात येत आहे. पुन्हा एकदा दुष्काळछायेच्या दिशेने मराठवाडय़ाची वाटचाल सुरू झाली आहे.

कापूस आणि सोयाबिनचे अधिक नुकसान

मराठवाडा विभागात १७ लाख हेक्टरवर कापूस लागवड होईल, असा अंदाज होता. या वर्षी १४.५३ लाख हेक्टरवर कापूस लावला गेला. पाऊस नसल्यामुळे थोडीफार वाढ झाली. जेथे जेथे कापसाला बोंड आले ते अळीसह असल्यामुळे या वर्षी कापसातून काहीएक नफा होणार नाही, असे शेतकरी सांगतात. औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड, सोयगाव तालुक्यातील १४ गावांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक आहे. बीड जिल्ह्य़ात ओलिताखालील कापसाचेही नुकसान झाले आहे. जसे कापसाचे तसेच सोयाबिनचेही झाले आहे. सरासरी १० लाख ३९ हजार हेक्टरावर सोयाबीन पेरले गेले. ही पेरणी १६९.८ टक्के एवढी अधिक आहे. पण औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्य़ांत तुडतुडी तसेच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

तुरीचे उत्पादन घटणार

उसाला पर्याय म्हणून तूर लावा, असे संदेश गेल्या वर्षी देण्यात आले होते. त्यामुळे तूर वाढली, पण त्याच्या खरेदीसाठी झालेल्या गोंधळामुळे या वर्षी ४.३५ लाख हेक्टरावर तुरीची पेरणी करण्यात आली. किडीमुळे आणि पाऊस नसल्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट होईल, असा अहवाल राज्य सरकारला देण्यात आला आहे. बहुतांश पिकांची स्थिती नाजूक झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एवढा कमी पाऊस असेल तर पिके कशी येणार, या विवंचनेत शेतकरी आहेत.