लखनौ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यानंतरही नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) मराठवाडा विद्यापीठातील कार्यकाळ पूर्ण करण्याचा मनोदय गेल्याच आठवडय़ात व्यक्त करणाऱ्या डॉ. सर्जेराव निमसे यांनी येथील कुलगुरूपदाचा राजीनामा कुलपतींकडे पाठविल्याची माहिती गुरुवारी मिळाली. त्यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठात खळबळ उडाली.
डॉ. निमसे यांची नांदेड विद्यापीठातील मुदत जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ात संपणार होती. तत्पूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना विद्यापीठात आमंत्रित करून पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान करण्याचा विशेष पदवीदान समारंभ, तसेच लातूर उपकेंद्र इमारतीचे उद्घाटन हे दोन कार्यक्रम पार पाडण्याचा त्यांनी निश्चय केला होता. पण त्यापूर्वीच त्यांनी कुलपतींकडे राजीनामा पाठवून तो स्वीकारण्याची व पदमुक्त करण्याची विनंती केल्याचे समजताच विद्यापीठ परिसरात त्यावर चर्चा सुरू झाली.
कुलगुरू निमसे दोन दिवसांपूर्वी दौऱ्यावरून परतले. लखनौ विद्यापीठातील जबाबदारी स्वीकारण्यासाठी मुदत घेण्याच्या प्रयत्नांना यश आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात असतानाच कुलपतींकडे तडकाफडकी राजीनामा पाठविल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
लखनौ विद्यापीठात कुलगुरूपदी डॉ. निमसे यांची निवड झाल्याचे गेल्या महिन्याच्या अखेरीस जाहीर झाले. तब्बल ५ वर्षे एका विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविल्यानंतर दुसऱ्या प्रांतातील जुन्या नामांकित विद्यापीठात कुलगुरूपदी जाण्याची संधी या गणितज्ञाला मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला भरते आले होते. पण या नियुक्तीबद्दल लखनौमधून ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्या डॉ. निमसे यांचे स्वागत करणाऱ्या नव्हत्याच! एका इंग्रजी वृत्तपत्राने त्यांच्या पात्रतेबद्दल मुद्दा उपस्थित करून डॉ. नरेंद्र जाधव यांच्याशी असलेल्या थेट कनेक्शनमधून निमसे यांची वर्णी लागल्याचा गौप्यस्फोट केला. त्याआधारे इकडेही बातम्या आल्या. तथापि डॉ. निमसे यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता, लखनौ झटपट गाठून तेथील विद्यापीठात रुजू होण्याचा निर्णय गुरुवारी घाईघाईने घेतला असावा, असे दिसते.
त्यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल प्रसारमाध्यमांना अधिकृत काही सांगितले नाही. तथापि त्यांच्या राजीनाम्याच्या माहितीला विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी, तसेच निमसेंच्या खास हितचिंतकांकडून दुजोरा मिळाला. राजभवनातून मिळालेल्या माहितीनुसार निमसे यांचे राजीनामापत्र तेथे गुरुवारीच कुरिअरद्वारे प्राप्त झाले, पण राज्यपाल तथा कुलपतींनी त्यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही.

‘लोकल’ ते ‘ग्लोबल’ आणि..!
दरम्यान, डॉ. निमसे शनिवारी (दि. ११) पदभार सोडण्याची शक्यता असून नव्या कुलगुरूंची निवड होईपर्यंत हंगामी कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती होते, याची चर्चा सुरू झाली आहे. कुलगुरूंनी कुलपतींकडे प्र-कुलगुरू दिलीप उके यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. विद्यापीठ परिसरात सर्वात वरिष्ठ व अनुभवी प्राध्यपकाकडे पदभार दिला जावा, अशी चर्चा सुरू आहे. डॉ. निमसे यांचा सुमारे पावणेपाच वर्षांचा कार्यकाळ अत्यंत लक्षणीय राहिला. एका ‘लोकल’ विद्यापीठाला ‘ग्लोबल’ करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले. भौतिक व पायाभूत सुविधा वाढवतानाच त्यांनी विद्यापीठात नवनवे अभ्यासक्रम सुरू केले. लातूरच्या उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून तेथेही त्यांनी अनेक अभ्यासक्रम सुरू केले. हिंगोलीला मॉडेल कॉलेज स्थापन केले. तथापि त्यांच्यावर ते प. महाराष्ट्राचे हित जपतात, असाच आरोप नेहमी झाला.