News Flash

पावसाळ्यात तहानलेल्या मिळकतखार गावाची व्यथा    

संतप्त ग्रामस्थांनी काढला पंचायत समितीवर मोर्चा

पावसाळ्यात तहानलेल्या मिळकतखार गावाची व्यथा    

संतप्त ग्रामस्थांनी काढला पंचायत समितीवर मोर्चा

अलिबाग तालुक्यात पाण्याचे संकट नसले तरी खारेपाटातील मिळकतखार ग्रामस्थांना भर पावसाच्या दिवसांतही पाणी विकत आणून पिण्याची वेळ आली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात ही परिस्थिती ओढवली आहे. पाणीसमस्येने ग्रासलेल्या मिळकतखारच्या ग्रामस्थांनी अलिबाग पंचायत समितीवर मोर्चा काढला.

अलिबाग तालुक्याच्या खारेपाट भागातील खाडीकिनारी असलेल्या गावांपकी मिळकतखार हे टोकावरचे गाव. मागील तीन-चार वर्षांपासून येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. धोकवडे येथे बांधलेल्या पाण्याच्या टाकीतून मिळकतखार गावाला पाणीपुरवठा होत होता. गावात एमआयडीसीची पाण्याची लाइन आलेली आहे. मात्र मिळकतखार गाव हे शेवटच्या टोकावर असल्याने पाण्याचा प्रेशर या गावापर्यंत पोहोचत नसल्याने ग्रामस्थांना पिण्यापुरतेदेखील पाणी मिळत नाही. तसेच १२ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत होता. यामुळे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टँकरने विकत पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न जास्त नसल्याने प्रत्येक वेळी विकत पाणी आणणे जमत नसल्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ स्वत: खर्च करून पाण्याचा टँकर मागवीत होते.

या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट असताना लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत या विषयावर जोरदार चर्चा झाली. चच्रेअंती ही समस्या सुटत नसल्याने मोर्चा काढून जाब विचारण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.  त्यानुसार मंगळवारी महिला, ग्रामस्थ यांनी अलिबाग पंचायत समितीवर मोर्चा काढून आपला राग व्यक्त केला. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता माळी यांच्या नावाने ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.

‘मागील चार वर्षांपासून मिळकतखार ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची समस्या असून याबाबत वारंवार पाणीपुरवठा विभागाला कळवले होते, त्याचबरोबर आमचे गाव समुद्रकिनारी असल्याने येथील विहिरींनाही खारे पाणी आहे. पावसातही पाण्याची सोय होत नसल्याने टँकरद्वारे पाणी आणावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गौरी-गणपती सणाच्या अगोदर आमची पाण्याची समस्या सोडवा, अन्यथा अशीच परिस्थिती राहिली तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहोत’, असे सरपंच ज्योती म्हात्रे यांनी सांगितले.

‘मिळकतखार गावचा पाणीप्रश्न ८ दिवसांत सुटणार आहे. या गावासाठी बोडणी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून २ कोटी निधी खर्च करून पाणीसाठा टाकी बांधण्यात आली आहे. त्याचे काम पूर्ण झाले असून पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात असून यापुढे या गावाला पाण्याची समस्या राहणार नाही. साठवणटाकीमध्ये ४ लाख लिटरचा साठा राहणार असून मिळकतखारचा पाणीप्रश्न सुटणार आहे. टाकीसाठी जागेची अडचण होती, मात्र तीही आता सुटली आहे. त्यामुळे मिळकतखार गावासह सारळ, रेवस या गावांचीही पाण्याची समस्या सुटणार आहे.’ असे पाणीपुरवठा उपअभियंता आर. एस. माळी यांनी सांगितले.

 

अलिबागेत भाजपची मशाल रॅली

अलिबाग : भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७० वष्रे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून रायगड जिल्हा भाजप महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी अलिबाग येथे मशाल रॅली काढण्यात आली.

स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झालेले स्वातंत्र्यसनिक व हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या हेतूने ही रॅली काढण्यात आली. शहरातील भाजप कार्यालयापासून निघालेल्या रॅलीची सांगता सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीजवळ झाली. यावेळी आंग्रे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी भारतीय स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झालेल्या हुतात्म्यांचे गुणगान गाणारी भाषणे झाली. रॅलीत सहभागी झालेल्या महिला वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत होत्या. विशेष म्हणजे सहभागी महिलांच्या हातात भाजपचा ध्वज नव्हे तर भारताचा राष्ट्रध्वज होता. अलिबाग शहरातील बालाजी नाका येथील हुतात्मा स्मारकालाही रॅलीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. रायगड जिल्हा भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. जिल्हाभरातील ५०० हून अधिक महिला या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2016 1:25 am

Web Title: march at panchayat committee office for water scarcity in alibag
Next Stories
1 रायगड जिल्ह्य़ात ८ हजार १७१ दहीहंडय़ा
2 कळवणमध्ये कांदा फेक आंदोलन
3 महाराष्ट्र-तेलंगण कराराने ‘निम्न पनगंगा’ अधांतरी
Just Now!
X