राहाता : राहाता शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, या गुन्ह्यची चौकशी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी व विशेष सरकारी वकील यांच्या साहाय्याने करण्यात यावी, या मागणीसाठी राहता शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. अल्पवयीन मुलीसमवेत झालेला हा प्रकार निंदनीय असून याच्या निषेधार्थ राहता शहरातील सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोकांनी एकत्रित येऊ न निषेध मोर्चा काढला होता.

पोलिसांनी या घटनेतील आरोपीचे मनोबल उंचावू नये यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे या वेळी अनेकांनी बोलून दाखवले. या घटनेतील आरोपी अनिल किसन थोरात विकृत प्रवृत्तीचा असून याआधी त्याने अनेक विद्यालयातील मुली व महिलांना त्रास दिला आहे. त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी पोलिस अधीक्षकांना पाठवलेल्या निवेदनात नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

या मोर्चाचे रूपांतर पोलीस ठाण्यासमोर निषेध सभेत झाले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ म्हणाले,की राहाता शहर व पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार, रोड रोमिओ यांचेवर पोलिसांचा वचक राहिला नसून पोलिसांचा धाक व दरारा शहरातून संपलेला असल्याने मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

माजी नगराध्यक्ष साहेबराव  निधाने म्हणाले, की गुन्हेगारी व गुंड प्रवृत्तीचे लोक खुलेआम पोलिसांबरोबर फिरताना दिसतात. या लोकांची जर पोलिसांची मैत्री होत असेल तर कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा कोणाकडून करायची . पोलिसांनी निष्पक्षपणे व कर्तव्यदक्षपणे भूमिका बजावणे गरजेचे आहे.

या वेळी मोहनराव सदाफळ, ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण गांधी ,मनसेचे विजय मोगले ,रामनाथ सदाफळ ,राजेश लुटे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, प्रदीप बनसोडे आदींची भाषणे झाली.

नागरिकांचे निवेदन पोलीस निरीक्षक अरुण परदेशी व उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी स्वीकारले. या घटनेत आरोपीला कुठल्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही,  कठोरात कठोर शासन होईल अशी दक्षता घेऊ  ,असे आश्वासन या वेळी त्यांनी दिले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाबळे, मुन्नाभाई शाह, सोपानकाका सदाफळ, गंगाधर बोठे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.