कोपर्डी प्रकरणातील निषेधाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा धारण करणारा मराठा समाज दलित विरोधी नसल्याचे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मंगळवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत केले. मराठा मोर्चांना काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठ्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देणे हेच मराठा मोर्चा संघटनांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत अॅट्रोसिटी कायद्याला विरोध नसून कायद्यामध्ये बदल करण्यात यावा, अशी आमची मागणी असल्याचेही मेटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मराठा समाजातर्फे मोर्चे काढण्यात येत आहेत. या मराठा क्रांती मूक मोर्चांमध्ये लोखोंचा मराठा जनसमुदाय रस्त्यावर उतरत आहे.

आतापर्यंत संभाजीनगर, उस्मानाबाद, जळगाव, बीड आणि परभणी येथे निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्च्यांमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. कोपर्डी घटनेतील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा करावी, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आदी मागण्या या मोर्च्यांद्वारे मांडण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत मराठवाडा व विदर्भापुरते मर्यादित असलेल्या या मोर्च्यांचे लोण पश्चिम महाराष्ट्रातही पसरण्याची शक्यता आहे. येत्या २५ सप्टेंबरला पुण्यात मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. सकाळी १०.३० वाजता पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील मुठा नदीच्या मोकळ्या मैदानापासून या मोर्चास सुरुवात होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका टॉकिज चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौक, संत कबीर चौक, नाना पेठ, क्वार्टर गेट, हॉटेल शांताईमार्गे लाल देऊळ, नवीन जिल्हा परिषद, हॉटेल ब्लू नाइलमार्गे विधान भवनावर हा मूकमोर्चा धडकेल. कोणत्याही राजकीय नेतृत्वाशिवाय हा मोर्चा काढणार असल्याचे क्रांती मोर्चाच्या संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.