धनगर समाजापाठोपाठ आता वडार समाजानेही नोकरी व शिक्षणातील आरक्षणासाठी संघर्ष सुरू केला आहे. समाजाचा अनुसूचित जाती किंवा जमातीत समावेश करावा अशी मागणी करून त्यासाठी येत्या दि. १२ ला पुणे शनिवार वाडय़ावर मोर्चाचा इशाराही त्यांनी दिला.
वडार समाज संषर्ष समितीची बैठक नुकतीच नगरला झाली. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याचे सचिव भरत विटकर होते. संयोजक सुरेश जेठे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, माजी नगरसेवक नितीन शेलार, रमेश शिंदे, लहू वतारे, आबासाहेब धनवटे आदी यावेळी उपस्थित होते.
विटकर यांनी यावेळी  सांगितले की, अतिशय मागास असलेला वडार समाज ब्रिटीश काळापासून सरकारी सोयी-सुविधांपासून मात्र वंचित आहे. पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी समाजाचा अुनसूचीत जाती-जमातीत समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचीही घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सन ९४ मध्ये नगरलाच झालेल्या समाजाच्या मेळाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पावर यांनीही ही घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र केवळ घोषणाबाजी करून राज्यकर्त्यांनी वडार समाजावर प्रत्यक्षात अन्यायच केला आहे. वडार समाजाची दिशाभूल करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे.
यापुढील काळात मात्र वडार समाज कोणत्याही भूल-थापांना बळी पडणार नाही असा इशारा विटकर यांनी दिला. ते म्हणाले, हा समाज एकसंघ नाही, याचाच गैरफायदा राज्यकर्त्यांनी कायम घेतला. समाजात फूट पाडून ही ताकद विभागण्यात आली. ब्रिटीशांच्याच काळात या समाजाची आदिवासी प्रवर्ग म्हणून गणना करण्यात आळी, मात्र आदिवसींचा दर्जा देण्यात राज्यकर्त्यांनी कामची टाळाटाळ केली आहे. आता समाज संघटित झाला असून राज्यातील समाजाच्या सर्व संघटना एका छताखाली आणून संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी समितीच्या वतीने येत्या दि. १२ ला पुणे येथे शनिवार वाडय़ावर मोर्चा नेण्यात येणार असून या मोर्चात समाजाने मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विटकर यांनी केले. विजय चौगुले यांचेही यावेळी भाषण झाले. शेलार यांनी प्रास्तविक केले, वतारे यांनी आभार मानले.