उत्पादन घटले आणि बाजारभावही पडले

पावसामुळे घटलेले उत्पादन, रोगराई आणि बाजारात घटलेले दर या साऱ्यांच्या परिणामामुळे सातारा जिल्ह्य़ातील फुल उत्पादक सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. सातारा जिल्हा हा फुल उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे. जिल्ह्य़ात १४४९ हेक्टर जमीन फुल लागवडीखाली येते. जिल्ह्य़ात झेंडू ११६४ हेक्टर, निशिगंध ९५ हेक्टर, गुलाब ६६ हेक्टर, शेवंती ४६ हेक्टर, मोगरा २७ हेक्टर आणि इतर फुलझाडं ४९ हेक्टर जमिनीवर लावली जातात. जिल्ह्य़ात झेंडूची लागवड मोठय़ा प्रमाणात होते. झेंडूच्या लागवडीत कोलकाता ऑरेंज, कोलकाता यलो, जंबो कोलकाता आणि छोटा झेंडू आदी जातींची लागवड मोठय़ा प्रमाणात होते. साधरणत: उन्हाळा आणि हिवाळा हा या फुलाच्या लागवडीसाठी आदर्श काळ समजला जातो. पावसाळय़ात अतिवृष्टीने फुले खराब होतात. उन्हाअभावीदेखील उत्पादनात घट होते. तसेच रोगराईमुळे फुलांना मोठा प्रादुर्भाव होतो. या साऱ्यांचा परिणाम पावसाळय़ात झेंडूचे उत्पादन अंत्यत अल्प येते. उन्हाळा, हिवाळय़ात एकरी १५ ते २० टनापर्यंत असणारे उत्पादन पावासाळ्यत दहा टनापर्यंत खाली येते. पावसाळ्यात झेंडूवर रोगांचा मोठा प्रादुर्भाव होतो. तसेच अतिवृष्टीमुळे फुलांचा बहरही अत्यल्प राहतो. तसेच पावसामुळे या फुलांचे आयुष्यदेखील अल्पायुषी ठरत असल्याने तोडण्यास उशीर झाल्यास लगेच फुले खराब होत आहेत.  दरम्यान उत्पादनाची खडतर कसोटी पार केल्यानंतर या फुलांना बाजारभावही चांगला मिळत नाही. उत्पादन, बाजारपेठेतील वाहतूक हा खर्च विचारात घेतला तर झेंडूला किलोमागे २५ ते ३० रुपये एवढा खर्च येतो. सध्या झेंडूला हा दरही मिळत नसल्याची खंत झेंडू उत्पादक मनोहर साळुंखे यांनी व्यक्त केली. दुसरीकडे फुलांची शेती करणारे शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. यामुळे त्यांना मोठय़ा बाजारपेठांचा आधार घेणेही परवडत नाही. सध्या या शेतक ऱ्यांची मिळून १० ते १२ ट्रक फुले मुंबईला जातात. पण तेथील दर निराशा करणारा आहे. उत्पादनविक्रीनंतर प्रत्यक्ष ग्राहकांच्या हातात फुले पडेपर्यंत मध्ये मोठी साखळी असल्याने ग्राहकांनाही हा झेंडू महाग दरानेच विकत घ्यावा लागत आहे.