11 August 2020

News Flash

हारातील झेंडू गायब, लीलीचा प्रवेश

आवक घटल्याने झेंडू तिप्पट दराने; शेतकऱ्यांवर संकट

बोईसर परिसरातील चित्रालय येथे झेंडू फूल नसलेले हार विक्रीसाठी असतानाचे छायाचित्र. छायाचित्र: हेमेंद्र पाटील

आवक घटल्याने झेंडू तिप्पट दराने; शेतकऱ्यांवर संकट

हेमेंद्र पाटील, लोकसत्ता

बोईसर : करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या टाळेबंदीत फुलांची मागणी बंद झाल्याने फुलशेती करणाऱ्या काही  शेतकऱ्यांनी उभ्या झेंडूवर ट्रॅक्टर फिरवले होते. आता बाजारात मागणी असताना देखील झेंडू फुल मिळत नाही. जी मिळत आहेत ती तिप्पट दराने मिळत आहेत. त्यामुळे विक्रेत्यांनी झेंडू ऐवजी लीली या फुलांचे हार तयार करून त्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. भाविकांना पूजाविधीसाठी हा लीलीचा हार घेणे भाग पडत आहे.

पालघर जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात फुलशेती केली जाते. या ठिकाणी उत्पादन घेतलेली झेंडू फुले मुंबईत दादर बाजारात  विक्रीसाठी जात असतात.  काही लहान शेतकरी स्थानिक बाजारपेठेत फुलांची विक्री करतात.  टाळेबंदीत बाजारपेठ अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेली फुले तशीच पडून कोमेजू लागली. परिणामी काही शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या फुलशेतीवर ट्रॅक्टर फिरवून टाकले होते.

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर फुल विक्रेत्यांना झेंडू फुलाची कमतरता दिसली.  शेतकऱ्यांनी झेंडू फुलाचे उत्पादन बंद केल्यामुळे त्याला पर्याय म्हणून  विक्रेत्यांनी सहज उपलब्ध होणाऱ्या लीली फुलाचे हार तयार करून त्याची विक्री सुरू केली आहे.

बोईसरमधील सर्वच फूल विक्रेत्यांकडे सध्या मोठय़ा प्रमाणात लीली फुलांचा साठा दिसून येतो. लीली या फुलाचे झाड एकदा लावले तर अनेक वर्ष त्यापासून उत्पादन मिळत असते. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर पहिल्याच आठवडय़ात लीली फुलांची आवक सुरू झाली. परंतु सुंदर हार दिसण्यासाठी झेंडू फुलेच उपयोगी असल्याने त्या फुलांची विक्रेते आतुरतेने वाट पाहत आहेत. टाळेबंदीत मंदिरे बंद असल्याने हार विक्रेत्यांवर देखील मोठे संकट उभे  आहे. यातच फुलाचा तुटवडा यामध्ये जर हाराचे दर वाढवले तर ग्राहक देखील हार विकत घेण्याकडे पाठ फिरवतील यासाठी जे पूर्वीचे दर आहेत त्याच दरात लीली फुलाने बनवलेले हार विकले जात आहेत.बाजारात पाच रुपये, १५ रुपये, ५० रुपये याच दराचे हार विक्रीसाठी उपलब्ध असून यामध्ये लीली फूल व पाने याचा वापर केला आहे. तर एखादे उपलब्ध झाले तर झेंडूचे फूलदेखील वापरले जाते.

झेंडू २०० रुपये किलो

टाळेबंदी अगोदर ७० रुपये किलोने झेंडू फूल  मिळत होते. मात्र सद्य:स्थितीत आवक बंद असल्याने काही शेतकऱ्यांनी आपल्या वाडीत लावलेली झेंडुची फुले हिच विक्रेत्यांना आधार आहेत. परंतु त्याचे उत्पादन कमी प्रमाणात असल्याने आठवडय़ातून एक-दोन वेळा फूल विक्रेत्यांकडे त्याचा पुरवठा केला जातो. मात्र त्याचा दर तिप्पट वाढला आहे.  सद्य:स्थितीत १५० ते २०० रुपये किलोने ही फुले घ्यावी लागत आहेत.  यामुळे काही ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात झेंडूचा उपयोग हार बनवताना केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 4:26 am

Web Title: marigold rate increased three times more due to shortage of supply zws 70
Next Stories
1 ‘सिकलसेल’च्या रुग्णांना करोनाची भीती
2 चाचणी अहवाल उशिरा आल्याने मृतदेह ६ दिवस पडून
3 आदिवासी जमिनींवर अतिक्रमण
Just Now!
X