सागरी जैवविविधता टिकविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा पुढाकार

पालघर : वाढवण समोरील समुद्रात असलेल्या खडकाळ क्षेत्रात दुर्मीळ सागरी मत्स्य जैवविविधता व शेवाळे आढळून आल्याने हे क्षेत्र सागरी अभयारण्य म्हणून घोषित करावे यासाठी पर्यावरणप्रेमींचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी समुद्री संशोधकांनी, अभ्यासकांनी या ठिकाणी आढळलेल्या मत्स्य प्रजातींची विविध निरीक्षणे नोंदवून ही जैवविविधता टिकविण्यासाठीचे प्रयत्नही सुरू केले आहेत.

वाढवणच्या समुद्रात बंदर उभारणी करून ही सागरी संपत्ती नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. या ठिकाणी अनेक दुर्मीळ मत्स्य प्रजाती व जैवविविधता आढळून येत असल्याने सागरी अभयारण्य घोषित करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी समाज माध्यमाद्वारे राबविलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बहुतांश नागरिकांनी ही जैवविविधता टिकवून ठेवली पाहिजे अशी मते समाजमाध्यमांवर नोंदविली आहेत. बॉम्बेयाना नावाची समुद्री गोगलगाय फक्त मुंबई समुद्रात आढळते मात्र ती इथेही आढळली आहे. पाइप फिश या माशाला राष्ट्रीय प्राणी वाघाप्रमाणेच संरक्षण प्राप्त असल्याची माहिती प्रा. भोईर यांनी दिली. त्यामुळे येथील जैवविविधता टिकविणे आवश्यक असल्याचे मत भोईर यांनी व्यक्त केले. इथे दगडाखाली आढळणारा पोरसेलिन क्रॅ ब (खेकडा) हा खेकडा नसून शिवंडचीच (लॉबस्टर) एक जात आहे. हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. याचबरोबरीने पाइप फिष, कोरल हे प्राणी, स्पायडर क्रॅ ब, पोर्सेलिन क्रॅ ब, तारामासा तसेच सॉफ्ट कोरल प्रजातीच्या तीन प्रजाती आहेत. त्यापैकी निळ्या रंगाचे प्रवाळ केवळ येथेच सापडत असावेत असा अंदाज पर्यावरण अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे.

दुर्मीळ प्रजातीचे समुद्री घोडे येथील स्थानिकांनी पाहिले असल्याचे म्हटले आहे. त्यातील पाइप फिश ही प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात असल्याची पुष्टी पर्यावरणप्रेमींनी सांगितली आहे. सागरी अभयारण्य घोषित करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत सागरी जीवांचे छायाचित्रे सर्वदूर पसरल्यानंतर  विविध भागांतून सागरी जीव अभ्यासकांकडून या जैवविविधता टिकविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक अभ्यासकांनी या भागाला भेटी देण्याचे योजिले आहे. विरार येथील विवा महाविद्यालयातील प्राध्यापक प्रो. जॉन्सन आणि त्यांच्या विद्यथ्र्यांनी अलीकडेच वाढवण समुद्राला भेट देऊन येथील सागरी जैवविविधतेची अनेक निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यामुळे येथील सागरी मत्स्यसंपदा व जैवविविधता टिकून राहावी यासाठी सुरू केलेल्या मोहिमेवर सरकार काय भूमिका घेईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाढवण नैसर्गिक मत्स्यबीज केंद्र

वाढवण हे नैसर्गिक मत्स्यबीज निर्मिती केंद्र असल्याचा उल्लेख केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने त्यांच्या अहवालात केला आहे. डहाणू नोटिफिकेशनने हेच नमूद करून पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात समावेश केला. तरीही सागरी अभयारण्य घोषित करण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे बंदर न बांधता जैवविविधता टिकवली पाहिजे, अशी अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत.