रवींद्र जुनारकर, गडचिरोली

विदर्भाचे खजुराहो अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्हय़ातील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य भाारतीय पुरातत्त्व विभागाकडून सुरू झाले आहे. या जीर्णोद्धार कामावर दोन कोटींपेक्षा अधिकचा खर्च अपेक्षित आहे.

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

या जिल्हय़ावर निसर्गाने भरभरून उधळण केली आहे. तसेच पुरातन ऐतिहासिक मंदिर देखील येथे आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या भारतीय पुरातत्त्व विभागाने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. गडचिरोली जिल्हय़ातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीतीरावर स्थित भगवान शिवाचे पुरातन मार्कंडेश्वर मंदिर हे उत्तर भारतातील प्रसिद्ध नागरा शैलीतील आहे. या गावी सुमारे २३ मंदिरांचा समूह आहे. इ.स. १८७३ मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिराकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. येथे २४ मंदिरे होती, परंतु सन १७७७च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले, अशी  भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे. त्यानंतर १९२४-२५च्या सुमारास आणखी काही मंदिरे कोसळली. सध्या येथे दखल घेण्याजोगी १८ मंदिरे आहेत. यात मरकड ऋषी, मृकंडु ऋषी, नंदिकेश्वरम, यमधर्म, मृत्यूंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तीदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर आदी प्रमुख मंदिरांचा समावेश आहे. येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आहेत. अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्टय़ आहे. मैथुन शिल्पे हे मरकडा मंदिराचे आणखी एक वैशिष्टय़.  मंदिराचे निर्माण इ.स. ९ ते १२ व्या शतकात झाले. १२० वर्षांपूर्वी स्थानिक गोंडराजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मात्र हे काम शास्त्रीयदृष्टय़ा योग्य नसल्याने मंदिराचा काही भाग उन्मळून पडला होता. या पाश्र्वभूमीवर भारतीय पुरातत्त्व विभागाने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले, अशी माहिती पुरातत्त्व विभाग नागपूरचे अधीक्षक डॉ. इजहार हाशमी व वरिष्ठ संरक्षण साहाय्यक प्रशांत शिंदे यांनी दिली. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली. यानुसार मंदिराच्या दोन्ही बाजूच्या तुलनेत जास्त नुकसान झालेल्या उत्तरेकडील बाजूच्या दुरुस्तीचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले. नुकसानग्रस्त दोन भिंतीदरम्यानचे दगड, विटा आणि चुना यांचा उपयोग करून दुरुस्तीसाठी करण्यात आला आहे. मंदिरातील जवळपास १५०० नुकसानग्रस्त दगड काढून टाकण्यात आले असून तिथे भराव घालण्याचे काम सुरू आहे. गर्भागृहातील दगडांना क्रमवारी देण्यात आली आहे. तसेच मूळ दगड व साहित्याची जोपासना होण्याच्या दृष्टीने शास्त्रोक्तरीत्या त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. आतापर्यंत मंदिराच्या भिंती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून कळसाच्या दुरुस्तीचे कार्य हाती घेण्यात आले आहे. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम मंदिराचा ऐतिहासिक कालखंडाचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर त्याचे डाक्युमेंटेशन तयार करण्यात आले. नागपूर येथील शिवानी शर्मा यांच्याकडून मंदिराच्या जीर्णोद्धाराचा एक सविस्तर आराखडा तयार केला. मंदिराच्या दगडावर कोरीव काम करायचे असल्याने राजस्थान येथून १५ तज्ज्ञ कारागिरांना बोलावण्यात आले. मंदिरासाठी दर्जेदार दगड हवा होता. सर्वत्र शोध घेतल्यानंतर मरकडा येथून दोन कि.मी.अंतरावर एका दगडाच्या खाणीमध्ये तो मिळाला. तोच दगड मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला गेला आहे. मंदिराचा काही भाग तुटलेला आहे, कळसही तुटलेला आहे. आता तिथे लोखंडी सळाख टाकून तुटलेल्या भागाचे नूतनीकरण करण्यात आले. आतापर्यंत या मंदिराच्या जीर्णोद्धारावर अंदाजित ७० लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण निधी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे. लवकरच या मंदिराचे काम पूर्णत्वाला जाईल, अशीही माहिती अधीक्षक हाशमी यांनी दिली.

* मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच पूर्णत्वाला जाईल. सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू आहे. मंदिराचा पुरातन काळातील अभ्यास करूनच कामाला सुरुवात केली आहे. ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.’’

– डॉ. इजहार हाशमी, अधीक्षक, पुरातत्त्व विभाग, नागपूर

* मागील पावणेदोन वर्षांपासून या ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. यासाठी मरकडा परिसरातील लोकांचीही मदत घेण्यात आली आहे. आधी या मंदिराची स्थिती योग्य नव्हती. मात्र जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यानंतर अधिक चांगले दिसणार आहे.

– प्रशांत शिंदे, वरिष्ठ संरक्षण साहाय्यक, पुरातत्त्व विभाग,

* ‘मरकडा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. जीर्णोद्धारामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.’’

– गजानन भांडेकर, अध्यक्ष, मरकडा मंदिर ट्रस्ट