पद्मशाली विणकर समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेयऋषी महामुनींचा रथोत्सव शनिवारी नारळी पौर्णिमेला शहरातील पूर्व भागात थाटात संपन्न झाला. लेझीम, झांज या पारंपरिक मर्दानी खेळांसह दक्षिणी चित्रपटशैलीचे नृत्य आणि कसरतीचे चित्तथरारक शक्तिप्रयोगांचे सादरीकरण आणि धनगरी ढोलपथकांसह पद्मशाली तेलुगू लोककला पथकांचा कलाविष्कार हे या रथोत्सवाचे वैशिष्टय़ होते.
विजापूर वेशीतील श्री मार्कंडेयऋषी मंदिरातून सकाळी दहाच्या सुमारास रथोत्सवाला प्रारंभ झाला. सोलापूरचे पालकमत्री विजय देशमुख यांच्या हस्ते श्री मार्कंडेयऋषींच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर रथोत्सव सुरू झाला. या वेळी पद्मशाली ज्ञाती समाजाचे अध्यक्ष तथा महेश कोठे, सरचिटणीस सुरेश फलमारी यांच्यासह सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त तथा अमरावती महापालिकेचे विद्यमान आयुक्त चंद्रकांत गुडेवार, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रा. मोहिनी पत्की, इंदिरा कुडक्याल, अंबादास गंजी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नगरसेवक पांडुरंग दिड्डी आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी, पहाटे मंदिरात श्री मार्कंडेयऋषी मूर्तीची महापूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम मान्यवरांनी पूर्ण केले.
‘जय मरकडेय’चा उद्घोष करीत वाजतगाजत निघालेल्या या रथोत्सवात पद्मशाली समाजबांधवांसह अन्य विविध जातिधर्मातील भाविक आणि कार्यकत्रे हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. विजापूर वेशीतून पूर्व भागात रथोत्सव पोहोचला तेव्हा त्यातील उत्साह अधिक दुणावला. पद्मशाली समाजातील शेकडो तरुण मंडळांनी लेझीम, झांज हे पारंपरिक मर्दानी सांघिक खेळांचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले. याशिवाय, अनेक मंडळांच्या तरुण कलावंतांनी चित्तथरारक शक्तिप्रयोग सादर करून रथोत्सवाची शान कायम राखली. दक्षिणी चित्रपटांचा प्रभाव असलेल्या तरुण कलावंतांनी अनेक नवनव्या तेलुगू चित्रपटांतील उडत्या चालीवरील गाण्यांवर आकर्षक नृत्याचे सादरीकरण केले. सोबत धनगरी लोकगीते व गजीढोल पथके होती. तेलुगू लोकगीते सादर करणाऱ्या कलावंतांनी अनेकविध तेलुगू लोकगीते सादर करून संस्कृतीचे दर्शन घडवले. रथोत्सवाच्या मार्गावर अनेक ठिकाणी रथोत्सवातील सहभागी मंडळांचे स्वागत करण्यात आले. आंध्र दत्त चौकात स्वागतासाठी काँग्रेस, भाजप व माकपच्या नेत्यांनी व्यासपीठे उभारून सर्व मंडळांचे स्वागत केले. त्या वेळी प्रत्येक मंडळाचा कलाविष्कार पाहावयास मिळाला. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. रथोत्सवाच्या शेवटी एका बलगाडीत ठेवलेला हातमाग आणि त्या हातमागावर वस्त्र विणणारे वयोवृद्ध श्रमिक जोडपे होते. रात्री दहानंतर रथोत्सव पार पडल्यानंतर हातमागावर विणले गेलेले वस्त्र श्री मार्कंडेयऋषींच्या मूर्तीला मोठय़ा श्रद्धाभावाने अर्पण करण्यात आले.
रथोत्सवात डॉल्बीला बऱ्यापकी आळा बसला होता. अर्थात, त्याचे श्रेय पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या प्रशासनाला दिले गेले. रथोत्सव मार्गावरील जातीयदृष्टय़ा संवेदनशील भागात पोलिसांनी अधिक दक्षता घेतली होती.