हिंगोली बाजार समितीत सोमवारी १५ हजार क्विंटलहून अधिक हळदीचा लिलाव झाला. मात्र, वजनकाटा झाला नव्हता. मंगळवारी याची तयारी होत असताना केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त आले व मुंडे समर्थकांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. बुधवारीही बाजार बंद ठेवण्यात आला. परिणामी बाजार समितीच्या आवारात हळद, भुईमूग विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना तीन दिवस िहगोलीतच मुक्काम ठोकावा लागला. दरम्यान, बाजार समितीअंतर्गत व्यापाऱ्यांनी गुरुवारी २ वेळा शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करून दिलासा दिला.
िहगोली बाजार समिती हळदीच्या व्यापारासाठी मराठवाडय़ात प्रसिद्ध आहे. मराठवाडय़ाबाहेरून मोठय़ा प्रमाणात हळद िहगोलीच्या बाजारपेठेत विक्रीला येते. सोमवारी १५ हजार क्विंटलहून अधिक हळद विक्रीस आली होती. लिलाव होऊन वजनकाटा करण्याचे बाकी असताना मंगळवारीही सकाळी नव्याने मोठय़ा प्रमाणात हळदीसह इतर मालाची आवक झाली. सुमारे १५ ते २० हजार क्विंटलपेक्षा अधिक हळद, तसेच भुईमूग शेंग व इतर धान्य विक्रीस आले. त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
मंगळवारी सकाळीच मुंडे यांच्या निधनाचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. त्यांच्या समर्थकांनी बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु मंगळवार आठवडी बाजार असल्याने काही व्यापाऱ्यांनी बुधवारी व्यापारपेठ बंद ठेवावी, अशी विनंती केली. तसेच समर्थकांनी समितीतील लिलाव बंद करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे प्रशासनाने मंगळवारचा लिलाव रद्द केला.
मुंडे समर्थकांनी लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे मंगळवारी लिलाव होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे बुधवारीही लिलाव होऊ शकला नाही.
सोमवारी माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना सुरुवातीला वजनकाटा न झाल्याने थांबावे लागले. तसेच दुसऱ्या दिवशी लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न व तिसऱ्या दिवशी बुधवारी बाजारपेठ बंद, यामुळे सलग ३ दिवस ‘बंद’ चा फटका बसला. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांची यामुळे उपासमार झाली. शेतकऱ्यांची दैना लक्षात घेऊन गुरुवारी मोंढय़ातील काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पुरी-भाजीचे जेवण दिले. बाजार समितीनेही सायंकाळी शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केल्याचे सचिव जब्बार पटेल यांनी सांगितले.