महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या खामगाव येथील गोदामात कालबाह्य़ व निकृष्ट रासायनिक खत नव्या कोऱ्या छापील थल्यांमध्ये पॅकिंग करून ते चढय़ा दराने विकण्याचे मोठे षडयंत्र उघडकीस आले आहे.
भाजपचे नेते व विधान परिषदेचे सदस्य पांडूरंग फुंडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांंनी या षडयंत्राचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी जिल्हा मार्केटिंग अधिकारी, फेडरेशनचे कर्मचारी व खामगावचे गोदामपाल चांगलेच अडचणीत आले आहेत. या गंभीर प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्य़ातील खताच्या काळाबाजाराची सखोल पोलिस चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या सहयोग तेल प्रकल्पातील एका गोदामात इफ्को कंपनीचे २०.२०.०-१३ हे २०११ चे उत्पादित कालबाह्य़ व निकृष्ट दर्जाचे मिश्रखत ठेवण्यात आले होते. या मिश्रखताचे ढेकळे झालेली असतांना ते फोडण्यासाठी तेथे थ्रेशर मशिन आणण्यात आली होती. हे निकामी झालेले खत बारीक करून २०१३ छापलेल्या नव्या कोऱ्या थल्यांमध्ये भरले जात होते.
ही माहिती भाजपा नेते पांडूरंग फुंडकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी भाजपा जिल्हा सचिव शेखर पुरोहित, तालुका अध्यक्ष शरद गायकी, शहराध्यक्ष संजय शिनगारे, नरेंद्र शिंगोटे यांच्यासह घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्या ठिकाणी या खताचा पंचनामा करून संबंधित गोदाम सील करण्यात आले. याच पध्दतीने त्या परिसरात कालबाह्य़ व निकृष्ट दर्जाच्या खताचा साठा असलेले मार्केटिंग फेडरेशनची सात गोदामे सील करण्यात आली.