करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; १३ जणांचे अलगीकरण

गुजरात राज्यातील वापी येथील करोना रुग्ण असलेल्या घाऊक भाजीविक्रेत्यांच्या संपर्कात आलेले तलासरीतील आठ भाजीविक्रेते आणि उधवा येथील पाच जण अशा १३ जणांना उधवा येथील कोविड केअर केंद्रात अलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल येईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून तलासरीतील बाजारपेठा चार दिवस बंद करण्यात आल्या आहेत.

वापीतील भाजीविक्रेत्यांच्या संपर्कात आलेल्यांचे स्व्ॉब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होणार आहे. तलासरी नगरपंचायत हद्दीतील भाजीपाला, फळविक्रेत्यांना नगरपंचायतीमार्फत एसटी महामंडळाच्या बसडेपोजवळील मोकळ्या जागेत बसविण्यात आले होते. यामधील बहुतांश भाजीविक्रेते वापी येथून व्यापाऱ्यांकडून भाजी खरेदी करत होते. मात्र वापीतील घाऊक भाजीविक्री करणारे दोन व्यापाऱ्यांना करोना झाल्याने तेथील घाऊक व्यापाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना आरोग्य, महसूल प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच वसईमधून उधवामध्ये आलेल्या पाच जणांचेही अलगीकरण करण्यात आले आहे. आरोग्य प्रशासनाने त्यांचे स्व्ॉब नमुने चाचणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागतील, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.