Maharashtra Bandh ९ ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन. आजच्या दिवसाचे औचित्य साधत मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. काही ठिकाणी घोषणा, आंदोलने तर काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनाही घडल्या आहेत. अशात एका आंदोलनात चक्क सनईचे सूर आणि शुभमंगल सावधानच्या घोषणा ऐकू आल्या. अकोला येथील अकोटमध्ये आंदोलनाचे हे आगळेवेगळे रूप पाहायला मिळाले. मराठा समाजाच्या मागण्या आणि घोषणा यांनी आकाश दणाणले होते. त्याचवेळी देऊळगाव येथील तेजस्विनी गावडेचा विवाह अकोल्याच्या गांधीग्राम येथील अभिमन्यू अढावसोबत होता. अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सदनात हा विवाह आयोजित करण्यात आला होता.
वधू- वर आणि पाहुणे मंडळी शिवाजी चौकातील आंदोलनाच्या ठिकाणी आले. या सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी घोषणाही दिल्या. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली. मराठा समाजातील आंदोलकांच्या साक्षीने अभिमन्यू आणि तेजस्विनी यांचा विवाह सोहळा पार पडला. आजवर मराठा मोर्चाचे शांत रूप सगळ्यांना पाहिले, त्यानंतर मराठा बांधवांचा आक्रोशही पाहिला. अशात अकोला येथील अकोटमध्ये शुभमंगल सावधानचा गजरही झाला आणि मंगलअष्टकांचे सूरही कानी पडले. मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकानेच या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तेजस्विनी आणि अभिमन्यू या दोघांसाठी आजचा दिवस कायम आठवणीत राहणारा ठरेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अकोटमधील या लग्नाची चर्चा आज दिवसभर रंगली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 3:13 pm