धुळ्यातील हेंद्रूण गावाकडे वधुपित्यांची पाठ; विवाहाची नवी सामाजिक समस्या

लग्नाच्या मांडवात उभे राहण्यासाठी वरपक्षाला शिक्षण- गुणवत्ता, आर्थिक मिळकत, घर, गाडी, बंगला किंवा जमीन- जुमला या अनिवार्य मानल्या जाणाऱ्या गोष्टी धुळ्यातील हेंद्रूण गावामध्ये निर्थक ठरल्या आहेत. कारण हे सारे असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये इथली पाणीटंचाईच इतकी भीषण बनत चालली आहे की, त्यापुढे वधूपिता आपल्या मुलींना या गावात देत नाहीत. त्यामुळे या गावातील तरुणांच्या लग्नाची नवीच सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.

धुळ्यापासून २० कि.मी  लांब असलेल्या  पाच हजारांहून अधिक लोकवस्तीच्या हेंद्रूण या गावामध्ये तलाव, विहिरी आहेत, मात्र पावसाळा संपल्यानंतर काहीच महिन्यांत त्या आटत असल्याने गावातील महिलांचे दिवसभराचे काम फक्त शेजारच्या गावांमधून पाणी आणण्याचे असते. धुळ्याजवळील हा परिसर जलटंचाईग्रस्त गावांचा असला, तरी गेल्या काही वर्षांमध्ये हेंद्रूण या गावामध्ये जलसंकट भीषण अवस्थेत पोहोचले आहे.  या गावात लग्न करून द्यायला वधुपिते नाखूष आहेत.

त्यामुळे गेल्या काही वर्षांत मुहूर्ताच्या सर्वच कालावधीत गावात तुरळक विवाह झाले आहेत.  लग्नसराई, नाच-गाणी आणि त्यानिमित्ताने गावात होणाऱ्या सोहळ्याचे वातावरण गावातील लोकांसाठी दुर्लभ झाले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये सुरू असलेल्या बारमाही पाणी टंचाईमुळे गावातील सुमारे शंभर ते दीडशे तरुणांचे विवाह जुळले नसल्याची माहिती गावातील सरपंच छोटय़ाबाई माळी यांनी दिली. या गावामध्ये विवाह झाल्यास आपल्या मुलीला वर्षभर पाणवाहक म्हणून राबवले जाईल, या भीतीने बाहेर गावांमधील वधुपिता येथील कोणत्याही तरुणांना आपली मुलगी देण्यास तयार नाहीत. परिणामी या शेकडो मुलांचे वाढते वय हे गावातील ज्येष्ठांसाठी चिंतेचा विषय बनले आहे.  या भागातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी दरवर्षी टंचाई दूर करण्याचे आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसतात. एरवी केवळ मते मागण्यासाठी गावाकडे फिरकणाऱ्यांनाही गावातील समस्यांशी काही घेणे नाही, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. लग्नच कमी होत असल्यामुळे गावात त्या अनुशंगाने होणारे व्यवसायही थंडावत चालले आहेत, अशी माहिती येथील सरपंचांनी दिली.

‘लग्नाळूं’ची समस्या

हेंद्रूण गावास दहा वर्षांपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने दरवर्षी गावातील लग्नसोहळ्यांचे प्रमाण आटत चालले आहे, शंभर ते दीडशे विवाहेच्छुक तरूणांचा त्यामुळे वैफल्यग्रस्ततेकडे प्रवास सुरू असल्याची चिंता गावातील ज्येष्ठांकडून व्यक्त होत आहे. यामुळे गावात नव्या सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात अशी भीतीही व्यक्त होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन पाण्याची समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी महिलांसह ग्रामस्थांनी केली

परिस्थिती काय?

गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वीपर्यंत हेंद्रूण या गावामध्ये पाणीटंचाई आत्ताइतकी नव्हती.  मात्र या भागात पाऊसच तुरळक पडू लागल्याने दहा वर्षांत ऐन पावसाळ्यातही मूलभूत गरजांच्या पाण्यासाठी टँकर किंवा शेजारील गावातील पाण्यांच्या साठय़ावर अवलंबून राहावे लागते. गावातील महिला दिवसभर इतर गावांतून पाणी आणण्याच्या कामाला जुंपलेल्या असतात. ज्यांच्याकडे गाडय़ा घेण्याची ऐपत आहे, त्यांच्याकडे स्कूटर आणि इतर वाहनांमधून पाणी आणले जाते. पण बहुतांश महिलांची दररोज दोन ते पाच कि.मी पायपिट फक्त पाण्यासाठी होते.