कंधार तालुक्यातील गोणार येथील घटना

घर बांधकामासाठी माहेराहून तीन लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तर रविवारी तिच्यासह दोन चिमुकल्यांना शेतालगतच्या विहिरीत ढकलून देत खून केल्याच्या तक्रारीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध सोमवारी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने तक्रार दिली आहे.

रंजना शरद पवळे, दिग्विजय व वैभवी, अशी मृतांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजना (वय २७) यांचा विवाह २००९ मध्ये गोणार येथील शरद पवळे याच्याशी झाला. त्यांना दिग्विजय (वय ९) व वैभवी (६) अशी दोन अपत्ये झाली. दरम्यान  सासरच्या मंडळींनी घर बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा सुरू केला. रंजना दिवाळीला माहेरी गेली असता तिने याबाबतची कल्पना माहेरी दिली होती; परंतु तिच्या वडिलांनी तिची समजूत घालून पुन्हा सासरी पाठवणी केली. त्यातच १ डिसेंबर रोजी सायंकाळी रंजनासह तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह शेताशेजारील विहिरीत आढळले. त्यामुळे सासरच्या मंडळींनी रंजना व तिच्या मुलांना मारून विहिरीत टाकले असल्याची फिर्याद रंजनाचा भाऊ व्यंकटेश बालाजी ढगे (रा. इज्जतगाव) यांनी कंधार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार रंजनाचा पती शरद पवळे, सासरा-पंडित पवळे, सासू मनाबाई पवळे व दीर मनोहर पवळेसह जाऊ सुनीता पवळे या पाच जणांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव करत आहेत.

मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा

रंजनाच्या मारेकऱ्यांना अटक केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्यात येतील, अशी भूमिका रंजनाच्या नातेवाईकांनी घेतली. दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी मृत रंजनाच्या सासरच्यांपैकी कोणालाही ताब्यात घेतले नव्हते.