दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी येथे देवदर्शनासाठी आलेल्या एका विवाहितेचा तीन वर्षांच्या मुलीसह नजीकच्या विहिरीत पाण्यात पडून मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील उमरड येथेही एका शाळकरी मुलीचा उजनी धरणाच्या पाण्यात पुडून मृत्यू झाला.
बाळगी येथे घडलेल्या दुर्घटनेत शिवक्का गुंडूराव खडके (३३) तिची मुलगी संचिता अशी दुर्दैवी मृत मायलेकीची नावे आहेत. श्रावण मासाचे औचित्य साधून शिवक्का ही मुलीसह गावात देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्या वेळी मुलगी संचिता ही खेळत-खेळत नजीकच्या विहिरीकडे गेली. त्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. संचिता ही विहिरीत पडल्याचे ऐकताच आई शिवक्का ही तिला वाचविण्यासाठी विहिरीकडे धावून आली आणि तिने विहिरीत उडी घेतली. यात दोघींचाही मृत्यू झाला. मंद्रूप पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे.
करमाळा तालुक्यातील उमरड येथे उजनी धरणातील पाण्यात पडून बुडाल्याने दीक्षा शरद काळे (८) या बालिकेचा अंत झाला. दीक्षा ही शाळेच्या मधल्या सुट्टीनंतर मैत्रिणींसोबत शेळ्या राखण्यासाठी धरणाच्या पाण्याजवळ गेली होती. परंतु पाण्यात पाय घसरून ती पाण्यात पडली आणि बुडाली. तिला मृतावस्थेत पाण्याबाहेर काढण्यात आले. करमाळा पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.