छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली, त्यामुळे संतप्त झालेल्या माहेरच्या लोकांनी वांबोरी येथे येऊन सासरच्या घराच्या दारातच अंत्यसंस्कार केले. या वेळी मोठा जमाव जमला होता. पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार घडला नाही.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, कळसिपप्री येथील माधुरी ऊर्फ सुवर्णा हिचा विवाह एक वर्षांपूर्वी वांबोरी येथील नितीन पंढरीनाथ पागिरे याच्याबरोबर झाला होता. एक महिन्यातच तिचा छळ सुरू झाला. तुझ्या बापाने हुंडा दिला नाही, तसेच डीजे घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आण, असे म्हणत तिचा छळ केला जात होता. तिला मारहाण करून शिवीगाळ करण्यात येत होती. या छळाला कंटाळून माधुरी हिने तीन दिवसांपूर्वी विषारी औषध घेतले. तिला नगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
माधुरीच्या मृत्यूची माहिती मिळताच ४०० ते ५०० लोकांचा जमाव वांबोरी येथे पागिरे वस्तीवर आला. त्या वेळी जमावाने नवरा नितीन पागिरे याच्या दारात माधुरीवर अंत्यसंस्कार केले. या वेळी पोलीस उपअधीक्षक वाय. डी. पाटील, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता, त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.
माधुरी पागिरे हिच्या मृत्यूप्रकरणी गोरक्षनाथ रंगनाथ भवर (रा. कळसिपप्री, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवरा नितीन पंढरीनाथ पागिरे, सासू जिजाबाई पंढरीनाथ पागिरे, सासरा पंढरीनाथ धोंडिराम पागिरे, नणंद सुनीता पळसकर (खारेकर्जुने, ता. नगर), संगीता आठरे यांच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत झाले, मारहाण, छळ आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नवरा नितीन व सासरा पंढरीनाथ यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे करीत आहेत.